ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारताला किवींनी धक्का दिला. न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघावर ४५ धावांनी मात केली. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १२७ धावांचे समाधानकारक लक्ष्य ठेवले होते. मात्र, न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारताचा डाव ७९ धावांत गुंडाळला आणि यजमानांना मोठा धक्का दिला.
सामन्याचा नाणेफेक न्यूझीलंडने जिंकून कर्णधार केन विल्यमसनने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच अचूक टप्प्यात गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते. त्यामुळे न्यूझीलंडला २० षटकांच्या अखेरीस केवळ १२६ धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, न्यूझीलंडचे हे आव्हान गाठतानाही भारताच्या नाकी नऊ आले. केवळ पन्नास धावांच्या आत भारताचे सात खेळाडू तंबूत दाखल झाले होते. धोनीने अखेरपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला पण त्यास यश आले नाही. याविजयासह न्यूझीलंडने भारताविरुद्धचा ट्वेन्टी-२० सामन्यांचा विजयी रथ कायम राखला आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये चार ट्वेन्टी-२० सामने झाले होते. चारही सामन्यात न्यूझीलंडने विजय प्राप्त केला होता. आजही न्यूझीलंडने इतिहास कायम राखत भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्याचा पाचवा विजय साजरा केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा