घरचे मैदान, चाहत्यांचा जल्लोषी पाठिंबा अशा अनुकूल वातावरणात यजमान बांगलादेशने अफगाणिस्तानवर ९ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत विजयी गर्जना केली. काही दिवसांपूर्वी आशिया चषक स्पर्धेत अननुभवी अफगाणिस्तानने बांगलादेशवर मात करत खळबळजनक विजयाची नोंद केली होती. या बोचऱ्या पराभवाची परतफेड करत बांगलादेशने विश्वचषक अभियानाची विजयी सुरुवात केली. या विजयाचा शिल्पकार ठरला तो अष्टपैलू खेळाडू शकीब उल हसन. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या या सलामीच्या लढतीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जादुई फिरकीच्या बळावर बांगलादेशने सातत्याने विकेट्स मिळवत अफगाणिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडले. अफगाणिस्तानचा प्रमुख फलंदाज नवरोझ मंगलला भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार मोहम्मद नबी केवळ ३ धावा करू शकला. विकेट्स मिळवताना बांगलादेशच्या गोलंदाजांना धावांवरही नियंत्रण मिळवल्याने अफगाणिस्तानचा डाव केवळ ७२ धावांतच संपुष्टात आला. गुलबदीन नईबने सर्वाधिक २१ धावा केल्या. शकीबने केवळ ८ धावांत ३ बळी टिपले. अब्दुर रझ्झाकने २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.
या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना तमीम इक्बाल आणि अनामूल हक जोडीने ४५ धावांची सलामी देत विजयाची पायाभरणी केली. तमीम २१ धावांवर बाद झाला. अनामूलने शकीबच्या साथीने बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अनामूलने ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४४ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान १७.१ षटकांत सर्वबाद ७२ (गुलबदीन नईब २१, शकीब उल हसन ३/८) पराभूत विरुद्ध बांगलादेश १२ षटकांत १ बाद ७८ (अनामूल हक ४४, समीउल्ला शेनवारी १/१४)
सामनावीर : शकीब उल हसन
बांगलादेशची गर्जना
घरचे मैदान, चाहत्यांचा जल्लोषी पाठिंबा अशा अनुकूल वातावरणात यजमान बांगलादेशने अफगाणिस्तानवर ९ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत विजयी गर्जना केली.
First published on: 17-03-2014 at 02:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World twenty20 bangladesh get afghan revenge