भारताच्या निखात झरीन (५१ किलो) हिने महिलांच्या गटात, तर सतीशकुमार (५६ किलो) व शाम काकरा (४९ किलो) अशा तीन खेळाडूंनी जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. ही स्पर्धा सोफिया (बल्गेरिया) येथे मंगळवारपासून सुरू झाली.
नानिजग (चीन) येथे १६ ते २८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ही स्पर्धा पात्रता फेरी मानली जात आहे. गतवेळी जागतिक युवा स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या निखात हिने टर्कीची खेळाडू इस्तिक नेरीमन हिच्यावर ३-० अशी मात केली. तिला दक्षिण कोरियाच्या सुकीयोंग ली हिच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.
पुरुषांच्या विभागात सतीश याने हंगेरीच्या नंदोर सोका याला ३-० असे सहज हरविले. त्याच्यापुढे आता क्युबाच्या झेवियर इबेनाझ याचे आव्हान असणार आहे. शाम याने पहिल्या लढतीत संयुक्त अरब अमिरातीच्या अब्दुल्ला अलमुल्ला याचे आव्हान संपुष्टात आणले. तांत्रिक गुणांच्या आधारे शामला विजयी घोषित करण्यात आले. त्याला श्रीलंकेच्या इशांका विथराणा याच्याशी खेळावे लागणार आहे.
आशियाई रौप्यपदक विजेत्या गौरव सोळंकी (५२ किलो) व नीलकमलसिंग (७५ किलो) यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.

Story img Loader