अमेरिका, वेस्ट इंडिज, ब्रिटन, बांगलादेश, पाकिस्तान आदी विविध देशांमधून सचिन तेंडुलकरच्या दोनशेव्या आणि अखेरच्या सामन्यासाठी तिकीटांची जोरदार मागणी होत आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींना हा सामना पाहायची इच्छा आहे, अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
‘‘सचिनचा सामन्याच्या तिकिटांची कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्रांप्रमाणेच अन्य राष्ट्रांमधील क्रिकेटप्रेमींकडूनही प्रचंड मागणी होत आहे. बीसीसीआय, एमसीएशी संलग्न क्लब्स, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, पोलीस प्रशासन अशा विविध विभागांना तिकिट्स देण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. या पाश्र्वभूमीवर तिकिटांच्या नियोजनासाठी एक समिती नेमण्यात येईल. अधिकाधिक क्रिकेटरसिकांना हा सामना पाहता येईल, यासंदर्भात आम्ही विचार करीत आहोत,’’ असे पवार यांनी सांगितले.
‘‘सचिनने आपल्या अखेरच्या सामन्याची दोन हजार तिकीटे मागितली होती, हे वृत्त चुकीचे आहे. सचिनकडून जी पाचशे तिकीटांची मागणी करण्यात आली आहे, ती पूर्ण करण्यात येणार आहे,’’ असे पवार यांनी सांगितले.
सिनेअभिनेता शाहरूख खानला हा सामना पाहायला परवानगी दिली जाईल का, या प्रश्नाला पवार यांनी अतिशय सावधपणे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘एमसीएच्या वास्तूत प्रवेशास परवानगी असलेल्या सर्व व्यक्तींना हा सामना पाहता येईल.’’

Story img Loader