मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १९९व्या कसोटी सामन्यात फक्त १० धावा काढून तमाम क्रिकेटरसिकांची घोर निराशा केली. पण मुंबईच्याच रोहित शर्माने मात्र पदार्पणातच शतक झळकावून एक सुखद धक्का दिला. दिग्गज फलंदाजांचा समावेश असलेला भारताचा निम्मा संघ फक्त ८३ धावांत आटोपला, तेव्हा सकाळच्या सत्रात वेस्ट इंडिजने सामन्यावर नियंत्रण मिळवले होते. पण दिवसअखेर मात्र भारताने पहिल्या डावात १२० धावांची आघाडी घेत आपला वरचष्मा सिद्ध केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत ऐतिहासिक द्विशतक साकारणाऱ्या रोहित शर्माची २०१०मध्ये कसोटी पदार्पणाची संधी हुकली होती. त्यानंतर तीन वर्षांनी चालून आलेल्या सुवर्णसंधीचे सोने करताना रोहितने विंडीज गोलंदाजीचा आत्मविश्वासाने सामना करीत नाबाद १२७ धावांची खेळी साकारली. पदार्पणात शतक साकारणारा रोहित हा १४वा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ देणारा रविचंद्रन अश्विन ९२ धावांवर खेळत आहे. त्यामुळे भारताने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३५४ अशी समाधानकारक धावसंख्या रचली आहे.
सकाळच्या सत्रात वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज शेन शिलिंगफोर्डने पहिल्या षटकापासूनच भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवला. सचिन वादग्रस्तरीत्या पायचीत होऊन परतला आणि क्रिकेटचाहत्यांची मोठी निराशा झाली. त्यानंतर शर्माने अश्विनसोबत सातव्या विकेटसाठी १९८ धावांची नाबाद भागीदारी रचली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर मालिकावीर पुरस्कार पटकावणाऱ्या रोहितला बुधवारी सचिनच्या हस्तेच भारतीय संघाची कॅप देण्यात आली होती. गुरुवारी रोहितने २२८ चेंडू खेळपट्टी टिकाव धरून १६ चौकार आणि एका षटकारासह आपली शानदार खेळी साकारली.
पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर तीन वर्षे आणि नऊ महिन्यांच्या कालखंडानंतर २६ वर्षीय रोहितचे कसोटी पदार्पणाचे स्वप्न साकारले आणि त्याने आपल्या खेळीनिशी सहाव्या स्थानावरील फलंदाज म्हणून आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले. ६ फेब्रुवारी २०१० या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहितचे कसोटी पदार्पण होणार होते. परंतु सराव करताना दुखापत झाल्यामुळे त्याचे कसोटी पदार्पण लांबणीवर पडले होते.
रोहितने आधी कप्तान महेंद्रसिंग धोनीसोबत सहाव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर त्याला अश्विनने तोलामोलाची साथ दिली. त्यामुळे वेस्ट इंडिजची पहिल्या डावातील २३४ ही धावसंख्या भारताला आरामात पार करता आली. खेळपट्टीवर तडे पडायला आता सुरुवात झाली आहे आणि या परिस्थितीचा कसा लाभ घ्यायचा, हे भारतीय गोलंदाजांना चांगले माहीत आहे. त्यामुळे चौथ्या दिवशीच सामन्यावर नियंत्रण मिळवण्याचे मनसुबे भारताने आखले आहेत.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर मात्र शेन शिलिंगफोर्डने निर्विवाद वर्चस्व गाजवत चार बळी घेतले आणि भारताची ५ बाद ८३ अशी अवस्था केली. शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर व विराट कोहली या फलंदाजांनी निराशा केल्यावर रोहितने भारताचा डाव सावरला. शिलिंगफोर्डने १३० धावांत ४ बळी घेतले.
‘‘रोहितमध्ये सेहवागसारखी गुणवत्ता आहे, असे व्यक्तिश: मला वाटते.  एकदिवसीय किंवा ‘ट्वेन्टी-२०’चा शिक्का घेऊन सेहवाग कसोटी क्रिकेटमध्ये आला होता. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी लक्षणीय आहे. रोहितच्या बाबतीतही असेच घडले आहे. या दोघांच्या पोतडीत बरेच फटके आहेत. त्यामुळे कोणत्याही क्रिकेटच्या प्रकारात ते शतक झळकावू शकतात.’’
प्रवीण अमरे, माजी क्रिकेटपटू
“ईडन गार्डन्स माझ्यासाठी खास आहे. कारण या मैदानात मी मुंबईकडून रणजी स्पर्धेमध्ये पदार्पण केले. तुम्ही जर काळजीपूर्वक नोंद घेतली तर आयपीएलचे कर्णधारपद आणि विजेतेपदही मला या मैदानातच मिळाले. या मैदानात खेळायला मला आवडते. मला अशी आशा आहे की, शुक्रवारचा दिवसही आमच्यासाठी चांगला असेल.”
रोहित शर्मा, भारताचा क्रिकेटपटू
धावफलक
वेस्ट इंडिज (पहिला डाव) : २३४
भारत (पहिला डाव) : शिखर धवन त्रिफळा गो. शिलिंगफोर्ड २३, मुरली विजय यष्टिचीत रामदिन गो. शिलिंगफोर्ड २६, चेतेश्वर पुजारा झे. रामदिन गो. कॉट्रेल १७, सचिन तेंडुलकर पायचीत गो. शिलिंगफोर्ड १०, विराट कोहली झे. पॉवेल गो. शिलिंगफोर्ड ३, रोहित शर्मा खेळत आहे १२७, महेंद्रसिंग धोनी झे. रामदिन गो. बेस्ट ४२, आर. अश्विन खेळत आहे ९२, अवांतर (बाइज ४, लेगबाइज ८, वाइड १, नोबॉल १) १४, एकूण १०२ षटकांत ६ बाद ३५४
बाद क्रम : १-४२, २-५७, ३-७९, ४-८२, ५-८३, ६-१५६
गोलंदाजी : टिनो बेस्ट १४-०-५३-१,  शिल्डन कॉट्रेल १५-३-५३-१, शेन शिलिंगफोर्ड ४१-८-१३०-४, वीरासॅमी परमॉल २०-१-५४-०, डॅरेन सॅमी १२-१-५२-०.