फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा

गतविजेत्या राफेल नदालने जर्मनीच्या यानिक हाफमानचा पहिल्या फेरीत सहज धुव्वा उडवत विक्रमी १२व्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याच्या दृष्टीने थाटात सुरुवात केली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने पहिल्या फेरीचा अडसर सहज पार केला.

१७ ग्रँडस्लॅम जेतेपदांना गवसणी घालणाऱ्या स्पेनच्या नदालने सलामीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत ११४व्या क्रमांकावर असलेल्या यानिक हाफमानला ६-२, ६-१, ६-३ अशी पराभवाची धूळ चारली. सर्बियाच्या जोकोव्हिचने पोलंडच्या हुबेर्ट हुकाझ याचे आव्हान ६-४, ६-२, ६-२ असे सहज परतवून लावले. त्याला दुसऱ्या फेरीत स्वित्र्झलडच्या हेन्री लाकसोनेन याच्याशी लढत द्यावी लागेल.

दरम्यान, गतजागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कॅरोलिन वोझ्नियाकी हिला रशियाच्या वेरोनिका कुडेरमेटोव्हा हिच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.