Royal Challengers Bangalore vs Gujarat Giants Match Updates: महिला प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामात बुधवारी (८ मार्च) गुजरात जायंट्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना खेळला जात आहे. स्पर्धेतील आपला पहिला विजय शोधत असलेल्या या दोन्ही संघातील या सामन्यात गुजरातने वेगवान सुरुवात करत आरसीबीचा ११ धावांनी पराभव केला. त्यामुळे त्यांचा पुढे जाण्याचा मार्ग थोडा अवघड झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यातील आजच्या सामन्यात गुजरातने आरसीबीसमोर २०२ धावांचे आव्हान ठेवले होते. गुजरातची सलामीवीर सोफिया डंकली हिने १८ चेंडूवर अर्धशतक पूर्ण करत स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले.
सलग दोन पराभवानंतर गुजरातचे खाते उघडले आहे. दुसरीकडे, आरसीबी संघ सलग तिसऱ्या सामन्यात पराभूत झाला. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने २० षटकांत सात गडी बाद २०१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ २० षटकांत ६ बाद १९० धावाच करू शकला. धावांचा पाठलाग करताना आरसीबीची चांगली झाली होती. कर्णधार स्मृती मंधाना आणि सलामीवीर सोफी डिव्हाईन यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र, स्मृतीला ही चांगली सुरुवात मोठ्या खेळीत परावर्तीत करता आली नाही, ती केवळ १८ धावा करून बाद झाली.
एका बाजूने सोफी डिव्हाईन उत्कृष्ट फटकेबाजी करत गुजरातला जेरीस आणले होते. तिने ४५ चेंडूत ६६ धावा केल्या. तिच्या खेळीला ८ चौकार आणि २ षटकारांचा साज होता. एलिस पेरीने २५ चेंडूत ३२ करत तिला साथ देण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या काही षटकात हैदर नाइट आणि श्रेयांका पाटील यांनी मोठे फटके मारत आरसीबीला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, धावांचे लक्ष्य पार करण्यात ते अपुरे पडले. गुजरातकडून अॅशले गार्डनरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर अॅनाबेल सदरलँडने २ विकेट्स घेत तिला साथ दिली. मानसी जोशीला ही एक विकेट घेण्यात यश मिळाले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरात जायंट्सने २२ धावांवर पहिली विकेट गमावली. एस. मेघना अवघ्या ८ धावा करून बाद झाली. मात्र सलामीवीर सोफिया डंकलीने तुफानी फटकेबाजी करत २८ चेंडूत ६५ धावांची शानदार खेळी केली. या अर्धशतकी खेळीला तिने ११ चौकार आणि ३ चौकाराचा साज चढवला. तिच्यासोबत खेळणाऱ्या हरलीन देओलने देखील दमदार खेळी करत ४५ चेंडूत ६७ धावा केल्या. तिच्या या खेळीत ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या दोघींव्यतिरिक्त इतर कोणालाही मोठी खेळी खेळण्यात अपयश आले.
महिला प्रीमियर लीग मध्ये सध्या फक्त ५ सामने झाले आहेत आणि अव्वल दर्जाची फलंदाजी पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यात नवनवीन स्फोटक खेळी पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या सहाव्या सामन्यातही असंच काहीसं पाहायला मिळालं. गुजरात जायंट्सची स्फोटक सलामीवीर सोफिया डंकलेने मोसमातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने केलेला विक्रम मोडला. डंकलेने पाचव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने केवळ 18 चेंडूंचा सामना केला आणि यामध्ये त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. डंकलेने मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरचा विक्रमही मोडला. तिने गुजरातविरुद्ध पहिल्याच सामन्यात २२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.