Royal Challengers Bangalore vs Gujarat Giants Match Updates:  महिला प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामात बुधवारी (८ मार्च) गुजरात जायंट्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना खेळला जात आहे. स्पर्धेतील आपला पहिला विजय शोधत असलेल्या या दोन्ही संघातील या सामन्यात गुजरातने वेगवान सुरुवात केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यातील आजच्या सामन्यात गुजरातने आरसीबीसमोर २०२ धावांचे आव्हान ठेवले आहे. गुजरातची सलामीवीर सोफिया डंकली हिने १८ चेंडूवर अर्धशतक पूर्ण करत स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरात जायंट्सने २२ धावांवर पहिली विकेट गमावली. एस. मेघना अवघ्या ८ धावा करून बाद झाली. मात्र सलामीवीर सोफिया डंकलीने तुफानी फटकेबाजी करत २८ चेंडूत ६५ धावांची शानदार खेळी केली. या अर्धशतकी खेळीला तिने ११ चौकार आणि ३ चौकाराचा साज चढवला. तिच्यासोबत खेळणाऱ्या हरलीन देओलने देखील दमदार खेळी करत ४५ चेंडूत ६७ धावा केल्या. तिच्या या खेळीत ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या दोघींव्यतिरिक्त इतर कोणालाही मोठी खेळी खेळण्यात अपयश आले.

अ‍ॅशले गार्डनर, दयालन हेमलता आणि अ‍ॅनाबेल सदरलँड यांना चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. त्यांनी अनुक्रमे १९, १६ आणि १४ धावा केल्या. कर्णधार स्नेह राणा अवघ्या २ धावा करून धावबाद झाली. बंगळुरूकडून श्रेयंका पाटील आणि हेदर नाइट यांनी सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर मेगन शुट आणि रेणुका सिंग ठाकूर यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत त्यांना साथ दिली. एलिसा पेरी सर्वात महाग गोलंदाज ठरली तिने ४ षटकात ४३ धावा दिल्या आणि एका विकेट काढता आली नाही.

या सामन्यात कोणता संघ विजयाचा प्रमुख दावेदार आहे याचा अंदाज बांधणे फार कठीण आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने गमावले आहेत. दुसरीकडे, संघाच्या दृष्टिकोनातून या सामन्यात आरसीबीचा विजय जवळपास निश्चित असे त्यांच्या चाहत्यांना वाटत होते मात्र गुजरातच्या फलंदाजांनी केलेली फलंदाजी यावरून हा सामना अधिक रंजक होईल असे दिसत आहे. गुजरात जायंट्सच्या तुलनेत आरसीबीची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभाग खूप मजबूत आहेत हा आशावाद फोल ठरला आहे. दोन्ही संघांना मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी आजचा विजय आवश्यक आहे.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे तिकीट मिळणार का? सूर्यकुमारला संघात स्थान मिळण्याची शक्यता, अशी असेल प्लेईंग ११

दोन्ही संघांची प्लेईंग ११

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हेदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), पूनम खेमनार, कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, मेगन शुट, रेणुका ठाकूर सिंग, प्रीती बोस.

गुजरात जायंट्स: सबिनेनी मेघना, सोफिया डंकले, हरलीन देओल, अ‍ॅनाबेल सदरलँड, सुषमा वर्मा (विकेटकीपर), अ‍ॅशले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा (कर्णधार), किम गर्थ, मानसी जोशी, तनुजा कंवर.