Smriti Mandhana Bowling: महिला प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रवास संपला आहे. या स्पर्धेत आरसीबीची कामगिरी काही खास नव्हती आणि त्यांच्या संघाला आठ पैकी फक्त दोन सामने जिंकता आले. बंगळुरूचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होता ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. स्मृती मंधाना या मोसमात कर्णधार म्हणून फ्लॉप झाली, पण असे असतानाही ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, मंधानाने आरसीबीच्या शेवटच्या सामन्यात गोलंदाजी करून सर्वानाच आश्चर्यचकित केले. तिच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
मंधानाने मुंबई इंडियन्सविरुद्ध गोलंदाजी केली. या सामन्यात मुंबईचा विजय जवळपास निश्चित होता, त्यामुळे कर्णधार स्मृतीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिने जेमतेम ३ चेंडू टाकले ज्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी ९ धावा करून विजयी लक्ष्य गाठले. आता मात्र मंधानाच्या गोलंदाजीचे सर्वानाच कुतूहल वाटत आहे. याची दोन कारणे आहेत, पहिले मंधानाने पहिल्यांदा तिच्या क्रिकेट करिअरमध्ये गोलंदाजी केली आणि दुसरे म्हणजे तिची गोलंदाजीची अॅक्शन जवळपास विराट कोहलीसारखी होती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार मंधानाची गोलंदाजी जवळपास विराट कोहलीसारखीच दिसत होती. क्रिकेट चाहते सतत सोशल मीडियावर या दोन खेळाडूंच्या गोलंदाजीची अॅक्शन निरखून पाहत असून यासाठी त्यांनी व्हिडिओंची तुलना शेअर केली आहे. माहितीसाठी विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त गोलंदाजी केलेली नाही, पण अंडर-१९ क्रिकेट खेळत असतानाच्या दिवसांमध्ये तो गोलंदाजी करत असे. एका मुलाखतीत विराटने स्वत:ला उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असल्याचे सांगितले होते.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी केली, अमेलिया केर (२२/३) याने आरसीबीला १२५ धावांवर रोखले. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना हरमनप्रीतच्या संघाने सहा विकेट्स गमावल्या आणि १६.३ षटकांत विजय मिळवला. मुंबईने अफलातून फलंदाजी करत आरसीबीचे कंबरडे मोडले, केरने २७ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने नाबाद ३१ धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला. याशिवाय यास्तिका भाटियाने २६ चेंडूत ३० धावांची खेळी केली.
विराट कोहलीची गोलंदाजीतील आकडेवारी
विराट कोहलीच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर या स्टार खेळाडूने आतापर्यंत २७३ वनडे सामन्यात एकूण ४ विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय प्रकारात, कोहलीने सुमारे ६४१ चेंडू म्हणजे सुमारे १०६ षटके टाकली आहेत. एवढेच नाही तर विराटने टी२० क्रिकेटमध्येही ४ विकेट्सच घेतल्या आहेत. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३ आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये ४ विकेट्स आहेत. स्मृती मंधानाबद्दल सांगायचे तर, महिला प्रीमियर लीगचा पहिला सीझन तिच्यासाठी खास नव्हता, पण तिने सीझनच्या शेवटी आपले गोलंदाजीचे कौशल्य दाखवले. अशा स्थितीत त्याच्याकडून आगामी मोसमात चांगली कामगिरी करून आरसीबीचे जेतेपद पटकावण्याची अपेक्षा चाहत्यांना असेल.