WPL 2023, UP-W vs DC-W: महिला प्रीमियर लीगचा २०वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर लीगमधील शेवटच्या साखळी सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने होते त्यात दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरिअर्सवर पाच विकेट्सने दणदणीत विजय मिळवत थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. दोन्ही संघ याधीच प्ले-ऑफमध्ये पोहचले आहेत. एलिमिनीटरचा सामना आता दिल्लीला खेळायची गरज नाही. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यात अंतिम फेरीसाठी २४ मार्च रोजी नॉकआउटचा सामना डी. वाय. पाटील मैदानावर रंगणार आहे.

यूपी वॉरियर्सने ठेवलेल्या १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात शानदार सुरुवात झाली. सलामीला कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र शफाली वर्मा १६ चेंडूत २१ धावा करून बाद झाली. जेमिमाह अवघ्या ३ धावा करून बाद झाली. पाठोपाठ कर्णधार मेग लॅनिंग ३९ धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेल्या मारिजन कॅप आणि एलिस कॅप्सी यांच्यात झालेल्या ५० धावांच्या भागीदारीने दिल्लीला विजयापर्यंत पोहोचवले. एलिस कॅप्सी ३१ चेंडूत ३४ धावा करून बाद झाली. मात्र मारिजन शेवटपर्यंत टिकून होती. अखेरच्या चेंडूवर चौकार मारत दिल्लीला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला.

एलिस कॅप्सीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तिने ३१ चेंडूत ३४ धावा केल्या. या खेळीला तिने ४ चौकार आणि एक षटकाराचा साज चढवला. तसेच तिने ४ षटकात २६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तिच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी तिला गौरविण्यात आले. यूपीकडून शबनिम इस्माईलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या तर यशश्री आणि सोफी एक्लेस्टोन यांनी प्रत्येकी एक विकेट घेत तिला साथ दिली.

हेही वाचा: Virendra Sehwag: “कर्णधारपदाचे गाजर दाखवून दोन महिन्यात बाहेर केले”, आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा धक्कादायक गौप्यस्फोट

तत्पूर्वी, दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूपी वॉरियर्सने २० षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या होत्या. यूपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर १३९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते ते त्यांनी लीलया पार केले. यूपीसाठी ताहिला मॅकग्राने तुफानी खेळी केली ती व्यर्थ ठरली. तिने ३२ चेंडूत नाबाद ५८ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. मॅकग्राने आपल्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार साज चढवला. तिच्या व्यतिरिक्त अ‍ॅलिसा हिलीने ३६, श्वेता सेहरावतने १९ आणि सिमरन शेखने ११ धावा करत तिला साथ दिली होती. यूपीकडून अष्टपैलू दीप्ती शर्माने ३ तर किरण नवगिरेने केवळ २ धावांचे योगदान दिले. सोफी एक्लेस्टोन खाते न उघडताच बाद झाली. अंजली सरवानी ३ धावा करून नाबाद राहिली. दिल्ली कॅपिटल्सकडून एलिस कॅप्सीने ३ विकेट्स घेतल्या. तर राधा यादवने २ आणि जेस जोनासेनने एक विकेट घेत तिला साथ दिली.

Story img Loader