UP Warriorz Women vs Delhi Capitals Women Match Updates: पहिल्यांदा खेळल्या जात असलेल्या महिला प्रीमिअर लीगच्या हंगामातील पाचवा सामना यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीने विजयासाठी २१२ धावांचे यूपीसमोर आव्हान ठेवले आहे. आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवलेल्या या दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र, या सामन्यात यूपी संघाने पहिल्या सामन्यातील धडाकेबाज फलंदाज ग्रेस हॅरिस हिला बाकावर बसवले. त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करताना किती अडचणी येतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
यूपीने नाणेफेक दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले, त्याचा फायदा घेत कर्णधार मेग लॅनिंगनंतर जेस जॉन्सन आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या शानदार फलंदाजीमुळे दिल्लीने यूपीसमोर २१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करणे यूपीसाठी सोपे नसेल. गेल्या सामन्यात यूपीला विजय मिळवून देणारा ग्रेस हॅरिसही या सामन्यात खेळत नाहीये. अशा स्थितीत यूपीच्या टॉप ऑर्डरला या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी करावी लागेल आणि पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल.
पहिली फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने चांगली सुरुवात केली. कर्णधार मेग लॅनिंग आणि सलामीवीर शफाली वर्मा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र शफाली १७ धावा करून मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाली. मात्र मेगने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत ४२ चेंडूत ७० धावा केल्या. त्या खेळीला तिने १० चौकार आणि ३ षटकारांचा साज चढवला. यासोबतच ती wpl मध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. त्यानंतर आलेल्या मारिजाने कॅप आणि अॅलिस कॅप्सी या केवळ अनुक्रमे १६ व २१ धावांची भर घालू शकल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि जेस जॉन्सन यांनी अर्धशतकी भागीदारी करत २०० धावांपार पोहोचवले. जेमिमाहने २२ चेंडूत ३४ धावा केल्या तर जेस जॉन्सनने २० चेंडूत ४२ धावा केल्या.
यूपी वॉरियर्सकडून ताहिला मॅकग्रा, सोफी एक्लेस्टोन, शबनम इस्माईल, राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली. शबनम इस्माईलकडून यूपीला खूप आशा होत्या. मात्र २९ धावा खर्च करत ती केवळ एकच विकेट घेऊ शकली. तसेच सामन्यादरम्यान मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर पावसामुळे थोडा व्यत्यय आला होता. त्यावेळी दिल्ली संघाने ९ षटके फलंदाजी करत एका विकेटच्या मोबदल्यात ८७ धावा केल्या होत्या. या सामन्यात आतापर्यंत यूपीचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. सर्व गोलंदाजांनी आठ किंवा त्याहून अधिक इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत.
दोन्ही संघांची प्लेईंग ११
दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, मारिजाने कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जॉन्सन, तानिया भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस.
यूपी वॉरियर्स: एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहिला मॅकग्रा, दीप्ती शर्मा, सिमरन शेख, देविका वैद्य, सोफी एक्लेस्टोन, शबनम इस्माईल, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड.