DC vs RCB: महिला प्रीमियर लीग २०२४ अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. यासोबतच सामनेही खूपच रोमांचक होत आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या झंझावाती खेळाच्या जोरावर मुंबईने अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात जायंट्सचा पराभव केला. आता त्याच मैदानात दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत १८१ धावा केल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामन्याच्या नाणेफेकीसाठी बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरही कर्णधारांसह मैदानात पोहोचली. या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी नाणे घेऊन करीना कपूर मैदानात उतरली होती, जिने मॅच रेफरीला नाणे दिले आणि त्यानंतर नाणेफेक झाली. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
फक्त करिनाच नाहीतर विविध क्षेत्रातील अनेक कतृत्त्ववान महिला या सामन्यासाठी दिल्लीत उपस्थित आहेत. या सामन्यासाठी करीना कपूरसोबत बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोम, उद्योजिका आणि शुगर ब्रॅडची मुख्य विनीता सिंग, फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता आणि पत्रकार, न्यूज अँकर फेय डिसूझा स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. मसाबाचे वडील वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर व्हिव्ह रिचर्ड्स आहेत.
दिल्ली कॅपिटल्स संघाने फलंदाजीची चांगली सुरूवात करत ५ बाद १८१ धावा केल्या. जेमिमा रॉड्रीग्ज आणि कॅप्सीने शानदार भागीदारी करत संघाच्या धावसंख्येत मोठी भर घातली. जेमिमाने ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५८ धावा केल्या तर कॅप्सीने ८ चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. आरसीबीकडून युवा फिरकीपटू श्रेयंका पाटीलने २६ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. एक पराभवही संघासाठी अडचणी निर्माण करू शकतो. दिल्लीलाही हा सामना जिंकून अव्वल स्थान मिळवायचे आहे. दिल्लीने आरसीबीला हा सामना जिंकण्यासाठी १८२ धावांचे तगडे आव्हान दिले आहे.