WPL 2024 DC vs RCB Final: महिला प्रीमियर लीग २०२४ चा अंतिम सामना १७ मार्च म्हणजेच आज रविवारी खेळवला जाणार आहे. WPL 2023 चा उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्स आणि पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एकमेकांशी भिडणार आहेत. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असल्याने दिल्लीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर आरसीबीने एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– quiz

दिल्ली आणि आरसीबीचा संघ गट सामन्यांमध्ये दोनदा आमनेसामने आला आहे. पहिला सामना बंगळुरू संघाने २५ धावांनी जिंकला तर दुसरा सामना दिल्लीने एका धावेने जिंकला. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आज इतिहास रचला जाणार आहे. याचं कारण म्हणजे पुरूषांच्या आयपीएल स्पर्धेत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स संघाने एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. दोन्ही संघांनी सर्व सीझन खेळले आहेत,पण त्यांना ट्रॉफी उचलता आलेली नाही. महिला प्रीमियर लीगच्या निमित्ताने दोन्हीपैकी एका संघाला जेतेपदावर आपले नाव कोरण्याची सुवर्णसंधी आहे.

महिला प्रीमियर लीगच्या या अंतिम सामन्यात तीन मोठे विक्रम होऊ शकतात, जाणून घ्या.

१. मॅरिजन काप – सर्वाधिक मेडन षटके

महिला प्रीमियर लीग २०२३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सची हेली मॅथ्यूज, साइका इशाक आणि दिल्ली कॅपिटल्सची मॅरिजन काप यांनी प्रत्येकी २ मेडेन षटके टाकली होती. टी-२० फॉरमॅटमध्ये जिथे तुफानी आणि वेगवान फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते त्यात मेडेन षटके हे त्या गोलंदाजाचे कौशल्य दाखवते. तर यंदाच्या २०२४ च्या हंगामात आतापर्यंत फक्त कापने २ मेडेन षटके टाकली आहेत. जर तिने अंतिम सामन्यात एखादे मेडेन षटक टाकले तर WPL च्या इतिहासात एकाच हंगामात सर्वाधिक मेडेन षटके टाकणारी एकमेव गोलंदाज ठरेल. कापने दिल्लीसाठी यंदाच्या हंगामात ११ विकेट्स घेतल्या आहेत.

२. एलिस पेरी – सर्वाधिक धावा करणारी खेळाडू
जगातील अव्वल दर्जाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी यंदाच्या हंगामात भन्नाट फॉर्मात आहे. तिने एकहाती संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. या ऑस्ट्रेलियन खेळाडूने ६२.४ च्या सरासरीने आणि १३०.५४ च्या स्ट्राईक रेटने ३१२ धावा केल्या आहेत. WPL 2024 मध्ये सर्वाधिक धावा एलिस पेरीच्या नावे आहेत, तर दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग चार धावांनी मागे आहे. गेल्यावर्षी मेग लॅनिंगने ३४५ धावांसह सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली.

३. स्मृती मानधना- सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या शर्यतीत

आरसीबीची कर्णधार आणि उत्कृष्ट फलंदाज स्मृती मानधना ही सर्वाधिक धावा करणारी तिसरी खेळाडू ठरू शकते. मानधनाने आतापर्यंत ९ डावांत २६९ धावा केल्या आहेत. मानधना गुजरातची बेथ मुनीपेक्षा १६ तर दिप्ती शर्मापेक्षा २६ धावांनी मागे आहे. मानधनाने जर अंतिम सामन्यात २६ पेक्षा जास्त धावा केल्या तर सर्वाधिक धावा करणारी तिसरी खेळाडू ठरेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wpl 2024 dc vs rcb final 3 milestiones can break marizanne kapp ellyse perry smriti mandhana bdg