WPL 2025 Live Streaming Details : महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) चे पहिले दोन हंगाम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, आता तिसरा हंगाम १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये यावेळी देशातील चार शहरांमध्ये स्पर्धेचे सामने खेळवले जातील. डब्ल्यूपीएलमध्ये एकूण ५ संघ सहभागी होतात. या स्पर्धेतील सामने कधी, कुठे आणि केव्हा खेळले जाणार आहेत, त्याचबरोबर लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? याबद्दल जाणून घेऊया.
डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने या स्पर्धेची ट्रॉफी जिंकली होती, तर दुसऱ्या म्हणजेच गेल्या हंगामात, स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाने जेतेपद जिंकण्यात यश मिळवले होते. यावेळी, डब्ल्यूपीएल २०२५ चा पहिला सामना १४ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल, तर अंतिम सामना १५ मार्च रोजी खेळला जाईल.
डब्ल्यूपीएल २०२५ चे सामने देशातील चार शहरांमध्ये होणार –
महिला प्रीमियर लीग २०२५ चे सामने देशातील चार शहरांमध्ये खेळवले जातील, हे पहिल्यांदाच घडणार आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा वडोदरा येथे सुरूवात होणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल. पुढील टप्पा प्रथमच यावेळी लखनऊमधील एकाना स्टेडियमवरही खेळवले जातील. अंतिम टप्पा मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाईल.
डब्ल्यूपीएलमध्ये एकूण ५ संघ खेळतात, ज्यात गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांचा समावेश आहे. लीग टप्प्यात, सर्व संघांना एकमेकांविरुद्ध किमान २ सामने खेळण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असलेला संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल, तर एलिमिनेटर सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये खेळला जाईल.
डब्ल्यूपीएल २०२५ सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कधी पाहता येणार?
चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर डब्ल्यूपीएल २०२५ च्या हंगामाच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय, सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर असेल. चाहते स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर डब्ल्यूपीएल सामने देखील पाहू शकतात. यावेळी डब्ल्यूपीएल २०२५ मधील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होतील आणि टॉस संध्याकाळी ७ वाजता होईल.