अनेकदा एखाद्या गोष्टीचं, घटनेचं टायमिंग इतकं चांगलं असतं की, ज्यामुळे लोकांचं नशीब बदलतं. असं वाटतं की, यापेक्षा उत्तम काही असूच शकत नाही. असंच काहीसं एका भारतीय महिला क्रिकेटपटूसोबत घडलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. तिथे टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. भारतीय संघातली यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोष हिला सोमवारी झालेल्या वीमेन्स प्रीमियर लीगच्या लिलावात लॉटरी लागली आहे.
ऋचा घोष ही आक्रमक फलंदाज आहे. तिने रविवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. रविवारी पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी केली तर सोमवारी महिला प्रीमियर लीगचा लिलाव होता. या लिलावात सर्व फ्रेंचायझींचं लक्ष तिच्यावर होतं. पाकिस्तानविरुद्धच्या खेळीने तिची किंमत वधारली. महिला प्रीमियर लीगच्या लिलावात तिच्यावर अनेक फ्रेंचायझींनी बोली लावली. अखेर १.९० कोटी रुपयांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ऋचाला आपल्या संघात सामील करून घेतलं.
सलग तीन चौकारांनी ऋचाचे भाव वधारले
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या काही षटकात भारताची अवस्था थोडी बिकट झाली होती. जेमिमा रॉड्रिग्सने एक बाजू लावून धरली होती. शेवटच्या तीन षटकात भारताला विजयासाठी २८ धावांची आवश्यकता होती. आयमन अमीनने १८ व्या षटकात गोलंदाजी सुरू केली. पहल्या चेंडूवर जेमिमाने १ धाव घेतली. पुढच्या तीन चेंडूंवर ऋचा घोष तुटून पडली. या तीन चेंडूवर तिने सलग तीन चौकार वसूल केले आणि सामना भारताच्या पारड्यात झुकवला. यातले दोन चौकार इतके शानदार होते की त्याचा आवाज ऐकून असं वाटलं एखाद्या व्यक्तीने कुऱ्हाडीने झाड तोडलं. पुढच्याच षटकात जेमिमा आणि ऋचाने सामना जिंकला.
हे ही वाचा >> WPL Auction : लिलाव संपण्याआधीच मुंबई इंडियन्सने जाहीर केलं कर्णधाराचं नाव, अनुभवी खेळाडूकडे पलटनचं नेतृत्व
खरंतर ऋचाचं नाव मार्की प्लेअर्सच्या (तगडे आणि महागडे खेळाडू) यादीत नव्हतं. त्यामुळे लिलावाच्या व्यासपीठावर तिचं नाव उशिरा आलं. तरीदेखील तिच्यासाठी १.९० कोटी रुपयांची बोली लागली. तिचं नाव पहिल्या सत्रात समोर आलं असतं तर कदाचित तिला यापेक्षा जास्त रक्कम मिळाली असती. परंतु मार्की प्लेअर्सच्या यादीत नसूनही ऋचासाठी मोठी बोली लागली. पाकिस्तानविरुद्धची खेळी यास कारणीभूत ठरली असं म्हटलं जात आहे.