बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला प्रीमियर लीग स्पर्धेसाठी आज (१३ फेब्रुवारी) मुंबईत लिलाव होणार आहे. पुरुषांच्या इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर बीसीसीआयने महिलांसाठी विमेन्स प्रीमियर लीग (Women’s Premier League) या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेच्या लिलावसाठी ४४८ महिला खेळाडू पात्र ठरले आहेत. यापैकी ९० खेळाडूंचं नशीब आज चमकणार आहे. विशेष म्हणजे जे खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत त्यामध्ये दोन समलैंगिक जोड्या देखील आहेत.
महिला प्रीमियर लीगच्या या लिलावात ४ महिला खेळाडू असे आहेत ज्यांनी एकमेकींशी लग्न केलं आहे. यापैकी एक जोडी इंग्लंडची आहे तर दुसरी दक्षिण आफ्रिकेची.
इंग्लंडची अष्यपैलू खेळाडू नॅट शिवर आणि जलदगती गोलंदाज कॅथरीन ब्रंट या दोघी अलिकडेच विवाहबंधनात अडकल्या आहेत. दोघींनी २०१९ मोठ्या थाटामाटात लग्न केलं. WPL च्या लिलावात कॅथरीन आणि नॅट या दोघींची बेस प्राईस प्रत्येकी ५० लाख रुपये इतकी आहे.
इंग्लंडची ब्रंट आणि शिवर ही जोडी लोकप्रिय आहेच. या दोघींच्या आधी दक्षिण आफ्रिकेच्या दोन महिला खेळाडूंनी लग्न केलं आहे. दक्षिण आफ्रिकेची डेन वॅन निकर्कने मेरिझेन कॅप हिच्यासोबत संसार थाटला आहे. या दोघींचं लग्न २०१८ मध्ये झालं होतं.
महिला आयपीएलमध्ये दिसणार समलिंगी जोड्या
समलिंगी नात्यात अडकलेल्या या दोन जोड्या महिला प्रीमियर लीगच्या लिलावात आपलं नशीब आजमावत आहेत. मेरिझेन कॅपची बेस प्राईस ४० लाख रुपये इतकी आहे. तर डेन वॅन निकर्कची बेस प्राईस ३० लाख रुपये इतकी आहे.
हेही वाचा – ILT20 Final: गल्फ जायंट्स बनले पहिले आयएल टी-२० चॅम्पियन; फायनल सामन्यात डेझर्ट वायपर्सचा केला पराभव
समलैंगिक क्रिकेटपटूंच्या या जोड्या जगप्रसिद्ध आहेत. महिला प्रीमियर लीगच्या लिलावात या चारही खेळाडूंवर बोली लागणं निश्चित आहे. चौघांचीही अलिकडच्या काळातली कामगिरी पाहता हे चारही खेळाडू आपल्याला महिला प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसतील. परंतु या जोड्या एकाच संघात जाणार की वेगवेगळ्या याचा उलगडा आज संध्याकाळपर्यंत होईल.