नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीपुढील विघ्ने कायम आहेत. जवळपास महिनाभर पुढे ढकलण्यात आलेल्या या निवडणुकीनंतर आता महासचिवपदासाठी रिंगणात उभे असलेल्या राकेश ठाकरन यांनी तांत्रिक कारणास्तव महाराष्ट्राच्या जय कवळी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी निवडणूक निर्णयाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महासचिवपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या जय कवळी यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली नसून महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या भारतकुमार व्हवाळ यांनी याच पदासाठी अन्य दुसऱ्या उमेदवाराची शिफारस केली आहे, असा दावा हरयाणा राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणारे ठाकरन यांनी केला आहे. नियमांनुसार, एकच व्यक्ती एका जागेसाठी दोन जणांची शिफारस करू शकत नाही.
ठाकरन यांनी या संदर्भात निवडणूक निर्णयाधिकारी निवृत्त न्यायाधीश डी. के. देशमुख यांना पत्र पाठवले असून कवळी यांच्यासह हिरेन पंडित आणि अमरजित सिंग यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. पंडित आणि सिंग यांची नावेही व्हवाळ यांनीच पुढे केली आहेत. पंडित हे उपाध्यक्षपदासाठी तर सिंग हे कार्यकारिणी सदस्यासाठी निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर असून निवडणूक ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Story img Loader