बहुप्रतीक्षित बॉक्सिंग इंडियाच्या निवडणुकीत आता रंग चढण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. तांत्रिक कारणास्तव महाराष्ट्राच्या जय कवळी यांचा महासचिवपदासाठीचा अर्ज रद्द ठरवावा, अशी मागणी हरयाणाच्या राकेश ठाकरन यांनी केली होती. पण त्यांचे हे आरोप जय कवळी यांनी फेटाळून लावले आहेत. ‘‘ठाकरन यांनी केलेले आरोप खोडसाळपणाचे आहेत. मी त्यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करतो. एक तर त्यांना नीट वाचता येत नाही किंवा नजरचुकीने त्यांनी हे आरोप केले असावेत,’’ अशा शब्दांत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष जय कवळी यांनी त्यांच्या आरोपांचे खंडन केले.
‘‘सरळमार्गी जिंकता येत नाही, म्हणून ते कांगावा करत आहेत. एक माणूस एका पदासाठी दोन जणांची शिफारस करू शकतो, हे निवडणुकीच्या नियमांमध्ये नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या भारतकुमार व्हवाळ यांनी माझ्यासह उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे हिरेन पंडित आणि कार्यकारिणी सदस्यासाठी रिंगणात असलेल्या अमरजित सिंग यांची शिफारस केली आहे. त्यात चुकीचे काय,’’ असा सवालही कवळी यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, ‘‘गेली २५ वर्षे मी बॉक्सिंग या खेळात कार्यरत असून बॉक्सिंगच्या विकासासाठी झटत आहे.  राजकारणात मला कोणताही रस नाही. बॉक्सिंग सुधारण्याचे काम मी करत आलो आहे आणि यापुढेही करत राहणार आहे.’’
बॉक्सिंग इंडियाची निवडणूक ११ सप्टेंबर रोजी होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर आहे. निवडणूक पारदर्शकपणे झाली तरच भारतीय बॉक्सर्सना देशाच्या झेंडय़ाखाली खेळता येणार आहे. पण सध्या आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध रंगले असून ही निवडणूक निर्विघ्नपणे पार पडावी, अशीच अपेक्षा बॉक्सर्सकडून केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा