Maharashtra Kesari Bhagyashree Fand: यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या भाग्यश्री फंडने बाजी मारली असून तिने मानाची गदा स्वतःच्या नावावर केली आहे. अंतिम सामन्यात भाग्यश्री फंड आणि अमृता पुजारी यांच्यात झालेल्या सामन्यात भाग्यश्रीने २-४ गुणांच्या फरकाने विजय मिळविला. वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे रामदास तडस इनडोर स्टेडियममध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
मानाची गदा उचलल्यानंतर भाग्यश्री फंडने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना कुटुंबियांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. ती म्हणाली, पहिली ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल आनंद वाटतो. माझे आई-वडील, पती, सासू-सासरे या सर्वांचा माझ्या यशात मोठा हातभार राहिला आहे. पैलवानांना किती कष्ट करावे लागतात, हे पैलवानांचा कळतात. जे पराभूत झाले त्यांचीही तेवढीच मेहनत असते. खेळात हार-जीत होत राहते.
वर्ध्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे अतिशय नीटनेटके असे आयोजन करण्यात आले होते. अशाप्रकारे इतर स्पर्धा घेतल्यास मुलींना प्रोत्साहन मिळेल. जेणेकरून राज्यातील मुलीही खेळांकडे आकर्षित होतील. ही चांगली बाब आहे, असेही मत भाग्यश्री फंडने व्यक्त केले. तसेच आर्थिक कारणामुळे अनेक मुली कुस्ती अर्ध्यातच सोडून देतात. त्यामुळे सरकारने अशा मल्लांना आर्थिक मदत दिली पाहीजे, अशी अपेक्षाही भाग्यश्रीने व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू करण्यात आलेली आहे. यंदा राज्यभरातून ३५० महिला कुस्तीगीरांनी यात सहभाग घेतला. महाराष्ट्र केसरी खिताब जिंकणाऱ्या
भाग्यश्री फंड हिला चांदीची गदा, रोख ३१ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले.