दुष्काळाने अवघा महाराष्ट्र होरपळत असताना देशोविदेशीचे फड गाजवणाऱ्या या मल्लांना दुष्काळानेच चीतपट केल्याची धक्कादायक चित्र समोर येत आहे. दुष्काळाच्या प्रभावामुळे राज्यातील जवळपास ५० टक्के कुस्तीचे फड रद्द झाले आहेत. सरकार आणि साखर कारखान्यांकडूनही उपेक्षा होत असल्यामुळे कुस्तीचा ध्यास घेतलेले हे मल्ल परिस्थितीपुढे हताशपणे सामोरे जात आहेत.
मल्लांच्या व्यथा मांडताना ‘रुस्तम-ए-हिंद’ आणि महाराष्ट्र केसरी पुरस्कार विजेते अमोल बुचाडे म्हणाले की, ‘‘दुष्काळामुळे सांगली, सातारा, नगरमधील फड यंदा रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील जास्त मल्ल शेतकरी कुटुंबातले आहेत. दुष्काळामुळे त्यांना तालमी सोडून घरी जावे लागले आहे. कुठूनही त्यांना मदतीचा हात मिळत नाही. सरकारला जर पारंपरिक कुस्ती टिकवायची असेल तर त्यांनी दुष्काळग्रस्तांबरोबरच मल्लांनाही मदत करायला हवी.’’
दोन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकणाऱ्या चंद्रहार पाटील यांनी सांगितले की, ‘‘बहुतांशी फड रद्द झाल्याने मल्ल देशोधडीला लागले आहेत. खुराक आणि दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवणेही त्यांना कठीण जात आहे. सरकारने आम्हाला आर्थिक मदत देण्यापेक्षा चांगली मैदाने आणि स्पर्धाची संख्या वाढवायला हवी. सभांना जेवढी गर्दी होत नाही तेवढी कुस्तीला होते, त्यामुळे नेते मंडळी आणि साखर कारखाने निवडणुकीपर्यंत मल्लांना दत्तक घेतात आणि त्यानंतर वाऱ्यावर सोडून देतात. कुस्तीकडे खेळ म्हणून गांभीर्याने कोणीही पाहत नाही, हीच खरी खंत आहे.’’
तथापि, कुस्तीला लोकाश्रयाची गरज असल्याचे कुस्तीपटू आणि अभ्यासक गणेश मानुगडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘वैशाख महिन्यापासून जत्रांना सुरुवात होते आणि त्यामध्ये कुस्तीचे फडही रंगतात. यंदा या फडाचे प्रमाण अत्यंत कमी होते. याचप्रमाणे झालेल्या फडांमध्ये नाममात्र पारितोषिक देण्यात आली. त्यात मल्लांचा प्रवासखर्चही भागत नव्हता.
पूर्वी संस्थाने होती, त्या वेळी कुस्तीला राजाश्रय होता, सारे काही आलबेल होते; पण संस्थाने खालसा झाल्यापासून अवस्था बिकट होत गेली. कुस्तीची परंपरा जपण्यासाठी मल्ल कष्ट घेत आहेत, पण उपासमारी सोडून त्यांच्या पदरी काहीही पडलेले नाही. सरकार, कुस्तीगीर परिषद एखाद दिवस मिरवतात, पण वर्षभर मल्लांच्या हाती काहीच लागत नाही. आम्हाला भीक नको, पण लोकाश्रय हवा आहे,’’ अशी मागणी मानुगडे यांनी केली आहे.

Story img Loader