जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. कुस्तीपटू प्रिया मलिकने भारतीयांच्या माना उंचावल्या असून हंगेरी येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचल्यानंतर प्रिया मलिकने मिळवलेल्या गोल्ड मेडलमुळे आनंद व्यक्त होत आहे.

प्रिया मलिकने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. प्रिया मलिकने बेलारुसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केलं.

प्रिया मलिकने याआधी २०१९ मध्ये पुण्यात खेलो इंडियात सुवर्णपदक, २०१९ मध्ये दिल्लीतील १७ व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि २०२० मध्ये पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूला रौप्यपदक

मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये शनिवारी रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. मिराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले आणि समस्त भारतीयांना सुखद भेट दिली. मणिपूरच्या या पोलादी महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलण्याची कामगिरी करताना कुठेही चेहऱ्यावरील आत्मविश्वास कमी पडू दिला नाही. तिने ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन अ‍ॅण्ड जर्क प्रकारात उचलले.