ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत मी प्रतिनिधित्व करावे हे माझे गुरू व रुस्तुम-ए-हिंद कै.हरिश्चंद्र बिराजदार यांचे स्वप्न होते. ते साकार करण्याची क्षमता माझ्याकडे आहे व आता केंद्र शासनाच्या मदतीमुळे मला आणखीनच प्रेरणा मिळाली आहे. ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करीत पदक मिळविण्याचे स्वप्न मी साकार करणार आहे, असे महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारे याने ‘लोकसत्ता’ स सांगितले.
सोनीपत येथे भारतीय कुस्ती महासंघातर्फे राष्ट्रीय शिबिर सुरू आहे. या शिबिरात राहुल हा सराव करीत आहे. राहुल याला केंद्र शासनाच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टीओपी) योजनेंतर्गत ४५ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. परदेशातील सराव, स्पर्धामधील सहभाग, खुराक, फिजिओ आदी सुविधांकरिता या निधीचा विनियोग केला जाणार आहे.
केंद्र शासनाने माझी निवड करीत मला आगामी विविध स्पर्धासाठी प्रोत्साहन दिले आहे, असे सांगून राहुल म्हणाला, ‘‘आमचे शिबिर सप्टेंबपर्यंत चालणार आहे. हे शिबिर सुरू असतानाच आम्ही विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्येही भाग घेणार आहोत. पुढील आठवडय़ात दोहा येथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये अव्वल कामगिरी करण्याची मला खात्री आहे. सप्टेंबरमध्ये अमेरिकेत जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होत असून या स्पर्धेत पहिले सहा क्रमांक मिळविणारे खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे त्या स्पर्धेत सर्वोत्तम यश मिळविण्याचा माझा प्रयत्न राहील. पुढील वर्षी आशियाई स्पर्धा व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील कामगिरी देखील ऑलिम्पिक प्रवेशासाठी उपयोगी होईल.’’
मिलिंद ढमढेरे, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा