भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाली होती. त्यानंतर संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुस्ती महासंघाची एक कार्यकारिणी गठित करण्यात आली होती. परंतु, केंद्र सरकारने ही कार्यकारिणी बरखास्त केली आहे. तसेच, संजय सिंह यांचंही निलंबन करण्यात आलं आहे. क्रीडा मंत्रालयाने रविवारी (२४ डिसेंबर) हा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचं कुस्तीपटूंकडून स्वागत होत आहे. भारताची अव्वल कुस्तीपटू आणि संजय सिंह यांनी निवडणूक जिंकल्यामुळे कुस्तीला रामराम करणारी ऑलिम्पिक पदकविजेती खेळाडू साक्षी मलिक हिनेदेखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक गुरुवारी (२१ डिसेंबर) पार पडली. ही निवडणूक जिंकत संजय सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष झाले होते. संजय सिंह हे कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. सर्व कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत ४० दिवस ठिय्या आंदोलनही केलं होतं. या आंदोलनानंतरही बृजभूषण यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. केवळ त्यांना कुस्ती महासंघाची निवडणूक लढण्यास मनाई करण्यात आली. परंतु, कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण सिंह यांच पॅनेल जिंकलं. त्यामुळे साक्षी मलिकने निराश होऊन कुस्तीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांच्या अध्यक्षतेखालील समिती निलंबित केली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयानंतर साक्षी मलिकने समाधान व्यक्त केलं आहे. तसेच ती म्हणाली, आमचा लढा देशातल्या सरकारविरोधात नाही, आमचा लढा केवळ खेळाडूंसाठी होता. मला आपल्या खेळाडूंची काळजी आहे.
साक्षी म्हणाली, या निर्णयाबद्दल मला अद्याप कुठेही लिखित स्वरुपात माहिती मिळालेली नाही. केवळ प्रसारमाध्यमांवर ही बातमी पाहिली. केवळ संजय सिंह यांनाही निलंबित केलं आहे की संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली आहे, याबाबत कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही. परंतु, असा निर्णय घेतला असेल तर मी त्याचं स्वागत करते. आमचा लढा या देशाच्या सरकारविरोधात कधीच नव्हता. आमचा लढा केवळ एका माणसाविरोधात होता. आम्हाला आपल्या खेळाडूंच्या भवितव्याची चिंता आहे. नव्या मुली या येताहेत, कुस्ती खेळतायत त्यांची आम्हाला काळजी आहे.
हे ही वाचा >> WFI : भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त, बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त करण्याचं कारण काय?
कोणतीही पूर्वसूचना न देता कुस्ती महासंघाच्या कार्यकारिणी समितीची बैठक बोलावण्यात आली. राष्ट्रीय स्पर्धा तातडीने आयोजित करण्यात आली आणि स्पर्धा आयोजित करताना महत्त्वाच्या नियमांचं पालन केलं नसल्याचा ठपका ठेवत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. तसंच, बृजभूषण शरण सिंह यांच्या मतदारसंघातील नंदिनी नगर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने साक्षी मलिकसह अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने कारवाई केली.