टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेला काही तासातच सुरुवात होणार आहे. यासाठी दोन आठवड्यांपूर्वी हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारनं वकिलाकरवी टीव्हीची मागणी केली होती. सुशील कुमारने तिहार जेलमधल्या त्याच्या बरॅकमध्ये टीव्ही हवा असल्याचं तुरुंग अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. २ जुलैला त्याने ही मागणी केली होती. कुस्तीविश्वात घडणाऱ्या घडामोडी माहिती होण्यासाठी टीव्ही हवा असल्याचं सुशील कुमारनं आपल्या अर्जात म्हटलं होतं. त्याने आपल्या वकिलाकरवी हा अर्ज तुरुंग प्रशासनाला दिला होता. आता ही मागणी तुरुंग प्रशासनाने मान्य केली आहे.

“आम्ही सुशील कुमारच्या वॉर्डमधील कॉमन भागात टीव्ही लावण्याची अनुमती दिली आहे. त्याने टीव्हीवर ऑलिम्पिक बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे इतर कैद्यांसोबत तो टीव्ही बघू शकतो”, असं दिल्ली तुरुंग प्रशासक संदीप गोयल यांनी सांगितलं आहे.

सुशील कुमारने यापूर्वी दिल्ली विशेष न्यायालयात एक मागणी केली. आपलं कुस्तीपटू म्हणून करिअर पुढेही सुरू ठेवण्यासाठी तुरुंगात आपल्याला कुस्तीपटूसाठीचा आहार मिळण्याची विनंती करण्यात आली होती. यामध्ये प्रोटीन देणाऱ्या हेल्थ सप्लिमेंट्स, ओमेगा-३ कॅप्सुल्स, जॉइंटमेंट कॅप्सुल्स, प्रि-वर्कआऊट सी-४, मल्टिव्हिटॅमिन जीएनसी आणि एक्सरसाईज बँड यांचा समावेश होता. मात्र, कोर्टाने त्याची ही मागणी फेटाळून लावली होती.

मुंबईत लक्झरी घरं खरेदी-विक्रीत वाढ; गेल्या सहा महिन्यात इतक्या कोटींची उलाढाल

४ मे रोजी दिल्लीतल्या छत्रसाल स्टेडियमबाहेर सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांचं सागर धनकरसोबत भांडण झालं होतं. हा वाद विकोपाला जाऊन या सगळ्यांनी मिळून सागर धनकरला मारहाण केली. ही मारहाण इतकी जास्त होती की त्यामध्ये उपचारांदरम्यान सागर धनकरचा मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुशील कुमार फरार झाला होता. त्याला पोलिसांनी शिताफीने दिल्लीमधून अटक केली.

Story img Loader