आणखी पाच वर्षे खेळण्याचा सुशीलकुमारचा निर्धार ; नरसिंगबरोबरच्या लढतीचे दडपण नाही
ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक मिळविणाऱ्या सुशीलकुमारने रिओ ऑलिम्पिकबरोबरच २०२०च्या ऑलिम्पिकमध्येही आपण खेळणार असल्याचे सांगितले.
सुशील व त्याचा सहकारी योगेश्वर दत्त यांनी यंदा रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकनंतर निवृत्त होण्याचे यापूर्वी संकेत दिले होते, मात्र २०२०च्या ऑलिम्पिकपर्यंत आपण स्पर्धात्मक कुस्तीसाठी तंदुरुस्त राहणार आहोत, असे सुशीलकुमारने सांगितल्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम झाला आहे. तो म्हणाला, ‘‘रिओ येथील ऑलिम्पिकनंतर निवृत्त होईन असे मी कधी बोलल्याचे मला आठवत नाही. जर मी अजूनही खेळत राहिलो तर कदाचित टोकियो येथे आणखी चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्येही मी खेळू शकेन.’’
रिओ ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या नरसिंग यादवने ७४ किलो गटात जागतिक स्पर्धेतील कांस्यपदकाद्वारे ऑलिम्पिक कोटा भारताला मिळवून दिला आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्यासाठी सुशील याला नरसिंगवर मात करावी लागणार आहे. त्याबाबत सुशील म्हणाला, ‘‘नरसिंग याच्याबरोबर लढण्याचे कोणतेही दडपण माझ्यावर नाही. आम्ही दोघेही मित्र आहोत व आम्ही एकत्र सरावही केला आहे. आमच्या लढतीमध्ये जो विजयी होईल, तो मल्ल भारताचे प्रतिनिधित्व करील. २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये मला ऐन वेळी प्रवेश मिळाला होता.’’
तंदुरुस्तीबाबत विचारले असता सुशील म्हणाला, ‘‘आता मी शंभर टक्केतंदुरुस्त आहे. सोनिपत येथे होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरात मी सहभागी होणार आहे. अमेरिकेत मी दोन महिने विशेष प्रशिक्षण शिबिरात भरपूर सराव केला आहे. प्रो-लीगसाठी प्रशिक्षणाकरिता मी जॉर्जियात गेलो होतो. तेथे प्रशिक्षण घेत असताना मला दुखापतीला सामोरे जावे लागले व त्यामुळे मला प्रो लीगमधून माघार घेण्याखेरीज अन्य कोणताच पर्याय नव्हता.’’

Story img Loader