आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने काही दिवसांपूर्वी २०२०च्या स्पर्धेतून कुस्तीला वगळण्याचा निर्णय घेतला होता. या परिस्थितीत कुस्तीला पाठिंबा देण्यापेक्षा स्क्वॉशसारख्या खेळाला क्रिकेटपटूंनी पाठिंबा दिल्यामुळे कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि ‘ऑफ-स्पिनर’ हरभजन सिंग यांनी काही दिवसांपूर्वी २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये स्क्वॉशला संधी द्यावी, असे आवाहन केले होते. सेहवागने ट्विटरवर ‘माझा स्क्वॉशला पाठिंबा आहे, तुमचा?’ असे ट्विट केले होते, तर सचिन आणि हरभजन यांनी स्क्वॉशला पाठिंबा देणारी छायाचित्रे प्रसिद्ध केली होती.
‘‘क्रिकेटपटू असे कसे काय करू शकतात? आम्ही सध्या खडतर मार्गातून जात आहोत. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे पुनरागमन व्हावे यासाठी क्रिकेटपटूंनी पाठिंबा द्यायला हवा होता. पण तसे न करता त्यांनी देशात जास्त प्रचलित नसलेल्या स्क्वॉश या खेळाला पाठिंबा दिला आहे,’’ असे दोन ऑलिम्पिक पदके पटकावलेल्या सुशील कुमारने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, ‘‘क्रिकेटपटूंनी चांगल्या मनाने हे सारे केले असेल, पण त्याचा कुस्तीच्या पुनरागमनावर काय विपरीत परिणाम होऊ शकतो, याचा विचार करायला हवा होता. कुस्तीने देशाची मान उंचावली आहेत, ऑलिम्पिकमध्ये चार पदके मिळवली आहेत, तर दुसरीकडे खरे सांगायचे तर स्क्वॉश या खेळाकडून भारताला ऑलिम्पिक पदकाची कोणतीही अपेक्षा नाही.’’
‘‘२०२०च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीला प्रवेश देण्यात यावा यासाठी आम्ही सारेच प्रयत्नशील आहोत. जर क्रिकेपटूंनी आम्हाला पाठिंबा दिला तर आमची बाजू अजूनच बळकट होऊ शकेल. आम्हाला सर्व स्तरांतून पाठिंब्याची गरज आहे,’’ असे लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेल्या योगेश्वर दत्तने सांगितले.

Story img Loader