Deaf and mute wrestler Virender Singh expressed his disappointment : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे देशातील अव्वल खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले. या यादीत क्रिकेटपटू मोहम्मद शमीसह अनेक खेळाडूंच्या नावाचा समावेश होता. दरम्यान, एका कुस्तीपटूने एक्सवर निराशा व्यक्त केली आणि त्याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. मूक-बधिर ऑलिंपियन वीरेंद्र सिंगला त्याचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी नाकारण्यात आल्यानंतर निराशा आवरता आली नाही.
२०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या वीरेंद्रने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना टॅग केले. कारण त्याने प्रतिष्ठित खेलरत्न, भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान न मिळाल्याबद्दल निराशा व्यक्त केली. वीरेंद्र हा अर्जुन पुरस्कारप्राप्त असून हरियाणा सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचेही त्याने तक्रारीत म्हटले आहे.
त्याने एक्सवरील पोस्टमध्ये लिहले, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर मला ५ डेफ ऑलिम्पिक पदके जिंकूनही खेलरत्न देण्यात आलेला नाही. त्याचबरोबर हरियाणा सरकारने आपल्या धोरणानुसार आठ कोटी रुपयेही दिलेले नाहीत. माझा गुन्हा एवढाच आहे की, मी दिव्यांग खेळाडू आहे. जय हिंद.”
हेही वाचा – Praveen Kumar : “ते खूप जास्त करायचे…”, ‘बॉल टॅम्परिंग’बाबत माजी भारतीय गोलंदाजाचे वक्तव्य
पीएम मोदींनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती मुर्मू यांनी सन्मानित केलेल्या खेळाडूंचे कौतुक केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये लिहले, ‘राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार २०२३ च्या अद्भूत विजेत्यांचे अभिनंदन. त्यांची उल्लेखनीय कामगिरी आणि अखंड समर्पण हे आपल्या देशासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी केवळ आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली नाही, तर जागतिक व्यासपीठावर भारताचा ध्वजही उंचावला आहे.’
हेही वाचा – शिखर धवनने सांगितले लोकांचे लग्न न करण्यामागचे मजेदार कारण, VIDEO होतोय व्हायरल
भारताची स्टार बॅडमिंटन पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला. दुसरीकडे, भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी, तिरंदाज ओजस प्रवीण देवतळे, शीतल देवी आणि आदिती गोपीचंद स्वामी आणि कुस्तीपटू अनंत पंघल यांसारख्या खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.