भारतातील अनेक दिग्गज कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाविरोधात संपावर बसले आहेत. दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप केला आहे. विरोध करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह देशातील अनेक अव्वल कुस्तीपटूंचा समावेश आहे.
कुस्तीपटूंनी त्यांच्या तक्रारी किंवा त्यांच्या मागण्यांचा नेमका तपशील शेअर केलेला नाही, परंतु ब्रिजभूषण शरण सिंग ज्या प्रकारे भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चालवत आहेत त्यामुळे ते कंटाळले आहेत हे स्पष्ट आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे देखील कैसरगंजमधून भाजपचे खासदार आहेत.
भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर हे देखील आंदोलक कुस्तीपटूंना भेटायला आले आहेत. ते म्हणाले, “हे काय आहे ते माहित नाही. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावरून कळते की काही कुस्तीपटू आंदोलनास बसले आहेत. मी त्यांना त्यांच्या समस्या विचारण्यासाठी आलो आहे. एकदा ते फेडरेशनमध्ये आले की, सर्व प्रश्न सोडवले जातील. प्रकरण काय आहे हे मला अद्याप सांगण्यात आलेले नाही. आजपर्यंत असा कोणताही मुद्दा माझ्यासमोर किंवा महासंघासमोर मांडण्यात आलेला नाही.”
हेही वाचा: ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, मनसेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
बजरंग, विनेश, रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती सरिता मोर, संगीता फोगट, सत्यवर्त मलिक, जितेंद्र किन्हा आणि राष्ट्रकुल क्रीडा पदक विजेता सुमित मलिक हे जंतरमंतर येथे जमलेल्या ३० कुस्तीपटूंमध्ये आहेत.
बजरंग पुनिया म्हणाला, “आमची लढाई सरकार किंवा भारतीय क्रीडा प्राधिकरणाविरुद्ध नाही. ती भारतीय कुस्ती महासंघाविरुद्ध आहे. आम्ही नंतर तपशील शेअर करू. ‘ये अब आर-पर की लड़ाई है’.” बजरंगचा सपोर्ट स्टाफ, त्याचे प्रशिक्षक सुजित मान आणि फिजिओ आनंद दुबे यांचाही या आंदोलनात सहभाग आहे. हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, असे आणखी एक पैलवान म्हणाला.
हेही वाचा: ICC Rankings: विराट कोहली बनणार ‘वन डे’तील नंबर १ फलंदाज, बाबर आझमची खुर्ची धोक्यात!
ब्रिजभूषण शरण सिंग हे २०११ पासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांची सलग तिसऱ्यांदा भारतीय संघाचे अध्यक्ष (WFI) म्हणून निवड झाली. “खेळाडू देशासाठी पदके जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात परंतु महासंघाने आम्हाला निराश करण्याशिवाय काहीही केले नाही. खेळाडूंना त्रास देण्यासाठी मनमानी नियम केले जात आहेत,” साक्षीने ट्विट केले. अंशू मलिक, संगीता फोगट आणि इतर कुस्तीपटूंनीही बॉयकॉट डब्ल्यूएफआय प्रेसिडेंट हॅशटॅगसह समान धर्तीवर ट्विट केले आणि पीएमओ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केले.