भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात भारतातील कुस्तीगीरांनी जंतर मंतरवर आंदोलन पुकारले आहे. गेल्या महिन्याभरापासून ऊन-पावसाची तमा न बाळगता शांततेत आपल्या मागण्यांसाठी धरणे पुकारले आहे. परंतु, त्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारकडून अद्यापही लक्ष दिले जात नाहीय. त्यामुळे या कुस्तीगीरांनी आता नव्या संसद भवनात महापंचायत भरवण्याचे ठरवले आहे. २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे.
मंगळवारी २३ मे रोजी कुस्तीगीरांनी जंतर मंतर ते इंडिया गेटपर्यंत शांततेत मार्च काढला होता. त्यानंतर, विनेश फोगाट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आम्ही २८ मे रोजी नव्या संसद भवनासमोर शांतीपूर्ण महिला महापंचायत करण्याचा निर्णय घेतला आहे”, असं विनेश फोगाट म्हणाली.
“महिला या महापंचायतीचं नेतृत्त्व करणार आहेत. आम्ही जो आवाज उठवला आहे तो सर्वदूर पसरला पाहिजे. जर आज देशातील मुलींना न्याय मिळाला तर, येणाऱ्या पिढ्यांना हिम्मत मिळेल”, असंही विनेश फोगाट म्हणाली.
विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकसह अनेक कुस्तीगर २३ एप्रिलपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषणविरोधात कारवाई होत नाही, तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार या कुस्तीगीरांनी केला आहे.
हेही वाचा >> नार्को चाचणीची आमची तयारी -बजरंग
नार्को चाचणीला तयार
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी नार्को चाचणी करण्यासाठी आपली तयारी असल्याचे रविवारी म्हटले होते. मात्र, त्यासाठी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांचीही नार्को चाचणी करण्याची त्यांनी अट ठेवली होती. ब्रिजभूषण यांची ही अट आपल्याला मान्य असल्याचे बजरंग सोमवारी म्हणाला.
मी याच माणसामुळे गप्प होते
इतर सगळ्या महिला मल्लांप्रमाणे इतकी वर्षे मी देखील गप्पच बसले होते असाही उल्लेख विनेश फोगाटने केला आहे. मी याच माणसामुळे (बृजभूषण सिंह) गप्प होते. बृजभूषण सिंह यांना का वाचवलं जातं आहे? मात्र आज मी हेदेखील सांगते आहे की जोपर्यंत बृजभूषण सिंहना अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही जंतरमंतर सोडणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून आमचा हा लढा सुरु आहे, असं विनेश फोगाट यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.