Brij Bhushan Saran Singh Narco Test Demand: दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे धरणे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, २०१६ रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह याला आव्हान दिले आहे. तिने ब्रिजभूषण सिंहला नार्को टेस्ट करून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे आव्हान दिले.
सात कुस्तीपटूंनी आपल्यावर लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर डब्ल्यूएफआयचे प्रमुख ब्रिज भूषण यांना त्यांच्या निर्दोष असल्याची खात्री असल्यास त्यांची ‘लाइव्ह डिटेक्टर नार्को चाचणी’ करावी, असे साक्षीने सांगितले. आंदोलक कुस्तीपटूंनी असेही सांगितले की जर ब्रिज भूषण अजूनही डब्ल्यूएफआयच्या कामकाजात सहभागी झाले तर ते स्पर्धा आयोजित करण्यास विरोध करतील.
पत्रकार परिषदेत साक्षी मलिक म्हणाली, “मी WFI अध्यक्षांना नार्को टेस्ट करण्याचे आव्हान देते. आम्हीही चौकशी करण्यास तयार आहोत. दोषी कोण आणि कोण नाही हे सत्य बाहेर येऊ द्या. त्याच वेळी, २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा बजरंग पुनिया म्हणाला, “सर्व स्पर्धा आयओएच्या एड-हॉक पॅनेलच्या अंतर्गत व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. जर ब्रिजभूषण कोणत्याही प्रकारे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतील तर आम्ही त्याला विरोध करू.”
कुस्तीपटूंनी गुरुवारी ब्रिजभूषण यांच्याविरोधातील तपासाच्या संथ प्रक्रियेच्या निषेधार्थ हातावर काळी पट्टी बांधण्याचा निर्णय घेतला. एका अल्पवयीनासह सात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ आणि धमकावल्याच्या आरोपाखाली ब्रिजभूषणला अटक करण्याची मागणी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी केली आहे. दिल्ली पोलिसांनी २८ एप्रिल रोजी WFI अध्यक्षाविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले होते. मात्र, अद्याप तपास पूर्ण झालेला नाही. यावर सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांनाही फटकारले होते. यापूर्वी सोमवारी संपावर गेलेल्या कुस्तीपटूंनी १५ दिवसांनी या स्पर्धेसाठी सराव सुरू केल्याचे वृत्त आले होते. बजरंग पुनिया आणि विनेश फोगट या कुस्तीपटूंनी सोमवारी सराव केला होता. हे कुस्तीपटू आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचण्यांची तयारी करत आहेत. त्याच वेळी, आयओच्या एड-हॉक पॅनेलने १७ मे पासून चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कुस्तीपटूंनी एक समिती स्थापन केली
विरोध करणाऱ्या पैलवानांनी ३१ सदस्यीय समितीही स्थापन केली असून, ही समिती वेळोवेळी पैलवानांना सल्ला देईल. यासोबतच व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी होऊ नये यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. कुस्तीपटूंना सल्लागार समितीने ब्रिजभूषणला अटक करण्यासाठी १५ दिवसांची म्हणजे २१ मे पर्यंत मुदत दिली आहे. त्याच वेळी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (SAI) महासंचालकांनी रविवारी संध्याकाळी उशिरा कुस्तीपटूंची भेट घेतली. जोपर्यंत ब्रिजभूषणला अटक करून कुस्ती संघटनेतून काढून टाकले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे पैलवानांनी सांगितले.
एड-हॉक समिती
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने कुस्तीपटूंच्या निषेध आणि उपोषणांदरम्यान भारतीय कुस्ती महासंघासाठी एड हॉक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य भूपेंद्र सिंह बाजवा आणि क्रीडापटू सुमा शिरू यांना सदस्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा कोणत्याही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाचा समावेश करण्यात येणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने पार पाडणे हे समितीचे मुख्य काम आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने २ मे रोजी या समितीच्या स्थापनेला मान्यता दिली आहे.