दिल्लीच्या जंतर-मंतरवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरोधात संपावर असलेल्या भारतीय कुस्तीपटूंनी शनिवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत आपली भविष्यातील रणनीती उघड केली. भारतीय कुस्तीपटू ७ मार्च रोजी म्हणजेच रविवारी सायंकाळी ७ वाजता कँडल मार्च काढतील. एवढेच नाही तर तिने त्या पत्रकार परिषदेत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.
विनेश फोगाट म्हणाली – प्रत्येकजण आपापले घर भरण्यात व्यस्त आहे
पत्रकार परिषदेदरम्यान भारतीय कुस्तीपटूंना विचारण्यात आले की, “टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणतो की, “ही कुस्तीपटूंची लढाई आहे आणि त्यांनी ती स्वतःच स्वतःची लढली पाहिजे.” यावर उत्तर देताना विनेश फोगाटने गांगुलीला टोला लगावला आणि म्हटले की, “अपना काम बनता भाड मे जाए जनता. प्रत्येक जण स्वतःचे घर भरण्यात व्यस्त आहे. अशा लोकांनी नरकात जावे.” अशी सडकून टीका तिने नाव न घेता केली.
पुढे बोलताना विनेश फोगाटने प्रसारमाध्यमांचे आभार मानत आपण जी लढाई लढत आहोत ती जिंकली पाहिजे असे सांगितले. ती म्हणाली की, “आमच्या समर्थनार्थ जंतरमंतरवर येणार्या सर्व लोकांना आवाहन करण्यात येते की, पोलिसांशी संघर्ष करू नये आणि त्यांना सहकार्य करावे. पोलिसांनाही विनंती आहे की, कोणालाही अडवू नका कारण तुम्ही सहकार्य कराल तर आम्हीही सहकार्य करू.”
भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया पत्रकार परिषदेत म्हणाले की, “जो कोणी आंदोलनावरून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करेल त्याला तो स्वतः जबाबदार असेल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. आम्ही दोन समित्या स्थापन केल्या असून त्या आता सर्व निर्णय घेतील असे तो म्हणाला.” “या समितीमध्ये खेळाशी संबंधित सर्व लोकांचा समावेश आहे आणि बाहेरील कोणीही व्यक्ती सहभागी नाही. पोलिसांसमोर आमचे म्हणणे अद्याप नोंदवले गेले नसून सर्वांचे जबाब घेऊन कारवाई करण्याची मुदत देण्यात आली असल्याचे साक्षी मलिक यांनी सांगितले.” त्याचवेळी पुढील कारवाईबाबत त्यांनी सांगितले की, “आमचे वकील कायद्यानुसारच कारवाई करतील.”
पुढे पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, “पंतप्रधान मोदी किंवा क्रीडामंत्र्यांशी संपर्क झाला का?” या प्रश्नावर पैलवानांनी सांगितले की, “त्यांना अनुराग ठाकूर यांचा अद्याप कोणताही फोन आलेला नाही. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही. क्रीडामंत्र्यांना प्रत्येक घटनेची जाण आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्यात आम्हाला काही अर्थ नाही. आम्ही एक समिती स्थापन केली आहे, ही समिती सर्व निर्णय घेईल. क्रीडामंत्र्यांकडे जावे की पंतप्रधानांकडे हा निर्णयही हीच समिती घेईल.”