Wrestling Federation of India : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. पुढील निर्णय येईपर्यंत महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांना कोणतेही निर्णय आणि कार्य करण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. कुस्तीपटूंनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केल्यानंतर आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी आपला पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारकडून हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. संजय सिंह यांना माध्यमांनी याबद्दल विचारले असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
एएनआय वृत्तसंस्थेने संजय सिंह यांच्या प्रतिक्रियेची माहिती दिली. ते म्हणाले, “मी विमानात होतो, त्यामुळे मला या निर्णयाची माहिती नाही. माझ्यापर्यंत अद्याप पत्र पोहोचलेले नाही. मी आधी पत्र पाहून घेईल आणि मगच या विषयावर बोलेण. माझ्या ऐकिवात आले की, मला फक्त काम करण्यापासून रोखण्यात आले आहे. कोणतेही निर्णय घेऊ नका, असा निरोप देण्यात आला आहे.”
टाइम्स नाऊने सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली की, संजय सिंह या निर्णयाच्या विरोधात तज्ज्ञांकडून कायदेशीर सल्ला घेत आहेत.
कोण आहेत संजय सिंह?
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय म्हणून संजय सिंह यांच्याकडे पाहिले जात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले संजय सिंह उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातून येतात. मागच्या दीड दशकापासून ते कुस्ती महासंघाशी जोडलेले आहेत. यादरम्यान बृजभूषण सिंह यांच्याशी त्यांची जवळीक झाल्याचे सांगितले जाते. २००८ साली वाराणसी कुस्ती संघाचे ते जिल्हा अध्यक्ष होते. २००९ साली ते उत्तर प्रदेशचे उपाध्यक्ष झाले.
संजय सिंह अनेकवेळा संघाच्या कार्यकारिणीत सामील झालेले आहेत. याशिवाय कुस्ती संघाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी अनेकदा परदेश दौरेही केले आहेत.
बृजभूषण सिंह यांची सावध प्रतिक्रिया
कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर बृजभूषण शरण सिंह म्हणाले, संजय सिंह हे माझे निकटवर्तीय नाहीत. जुन्या कार्यकारिणीला तत्काळ एक निर्णय घ्यावा लागला. अंडर २० आणि अंडर १५ च्या राष्ट्रीय स्पर्धांबाबत. ३१ डिसेंबरला त्यांचे सत्र समाप्त होईल. त्यानंतर ही स्पर्धा संपत आहे. त्यामुळे त्यांचं एक वर्ष वाया जाईल. यामुळे महासंघातील सर्व सदस्यांनी मिळून हा निर्णय घेतला. कोणत्याही परिस्थितीत खेळाचं वातावरण तयार व्हावं, याकरता हा निर्णय घेण्यात आला होता.