ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत २०२० नंतर कुस्तीला हद्दपार करण्याच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) निर्णयाविरोधात विविध देशांच्या ऑलिम्पिक संघटना एकत्र आल्या आहेत. राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना महासंघाचे (एएनओसी)उपाध्यक्ष रणधीरसिंग यांनी ही माहिती दिली.
एएनओसीच्या कार्यकारिणीची नुकतीच सिडने येथे बैठक झाली. कुस्तीच्या समावेशाबाबत या बैठकीत एकमताने पाठिंबा देण्यात आला. कुस्तीला वगळण्याच्या निर्णयाचा निषेध करीत या कार्यकारिणीने आयओसीविरुद्ध दंड थोपण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगून रणधीर म्हणाले, कुस्ती हे माझे जीवन आहे. या खेळात आपल्याला आतापर्यंत चांगले यश मिळाले आणि भविष्यात कुस्तीत भारतास मोठे यश मिळण्याची शक्यता दिसत असतानाच आयओसीने आपल्या मल्लांची निराशा केली आहे. कुस्तीचे स्थान टिकविण्यासाठी केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी यापूर्वीच आयओसीकडे पत्रव्यवहार केला आहे. अन्य देशांमधूनही असेच प्रयत्न करण्यात आले आहेत. कुस्तीचे स्थान टिकविले जाईल अशी मला खात्री आहे. एएनओसीच्या कार्यकारिणीच्या बैठकीस आशियाई ऑलिम्पिक समितीचे मुख्य शेख अहमद अल फहाद अल सबाह हेही उपस्थित होते.
आयओसीच्या कार्यकारिणीची फेब्रुवारीत बैठक झाली होती. त्यामध्ये २०२० च्या ऑलिम्पिकपासून कुस्तीस वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयओसीची सर्वसाधारण सभा ब्यूनोस आयर्स येथे सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्यामध्ये या निर्णयावर मतदान घेतले जाणार आहे.  एएनओसीच्या बैठकीत कुस्तीची बाजू मांडल्याबद्दल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांनी रणधीरसिंग यांचे आभार मानले आहे. ते म्हणाले, कुस्तीचे ऑलिम्पिकमधील स्थान राहील असा मला आत्मविश्वास आहे. या खेळाचे ऑलिम्पिकमधील अस्तित्व टिकविण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करीत आहोत.

Story img Loader