भारतीय कुस्ती महासंघाची देखरेख करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेची तात्पुरती समिती स्थापन करून दोन आठवडे झाले आहेत, परंतु कुस्ती महासंघाच्या निवडणुकीच्या दिशेने अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. समितीच्या तीन सदस्यांपैकी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती अद्याप झालेली नाही, मात्र येत्या सात ते दहा दिवसांत कुस्ती संघटनेच्या निवडणुका जाहीर होतील, असे आयओएमधील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतरच निवृत्त न्यायमूर्तीची नियुक्ती केली जाईल, जो निवडणुकीची जबाबदारी सांभाळेल. आयओए अध्यक्ष पीटी उषा आणि सहसचिव कल्याण चौबे निवडणूक घोषणेची जबाबदारी सांभाळतील.
४५ दिवसांत निवडणुका होणार आहेत
क्रीडा मंत्रालयाने आयओएवर ४५ दिवसांत निवडणुका घेण्याची जबाबदारी सोपवली आहे, मात्र सध्या तात्पुरती समिती कुस्ती उपक्रम सुरू करण्यात व्यस्त आहे. या समितीमध्ये आयओएचे कार्यकारी सदस्य भूपेंद्र सिंग बाजवा आणि ऑलिम्पियन नेमबाज सुमा शिरूर यांचा समावेश आहे. तिसरा सदस्य म्हणून निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती केली जाणार आहे.
ट्रायलमध्ये १७०४ पैलवान खेळणार असून त्यापैकी ३९४ मुली आहेत
तात्पुरती समितीतर्फे १७ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील आशियाई चॅम्पियनशिपच्या चाचण्या बुधवारपासून सुरू होत आहेत. एनआयएस पटियाला आणि साई (SAI) सेंटर सोनीपत येथे १९ मे पर्यंत होणाऱ्या चाचण्यांसाठी विक्रमी १७०४ कुस्तीपटूंनी प्रवेश केला आहे. पुरुषांच्या फ्री स्टाईल प्रकारात जास्तीत जास्त ८८३ कुस्तीपटू सहभागी होतील. यामध्ये १७ वर्षांखालील ४९० आणि २३ वर्षांखालील गटात ३९३ कुस्तीपटू खेळणार आहेत. महिला गटात ३९४ कुस्तीपटूंनी प्रवेश केला असून त्यात १७ वर्षांखालील २४५ आणि २३ वर्षांखालील १४९ कुस्तीगीरांचा समावेश आहे. ग्रीको रोमनसाठी ४२७ कुस्तीपटूंनी प्रवेश दिला असून यामध्ये २०७ जणांनी १७ वर्षांखालील तर २२० जणांनी २३ वर्षांखालील स्पर्धेसाठी प्रवेश दिला आहे.
जागतिक कुस्ती महासंघाने प्रवेशाची तारीख वाढवली
या चॅम्पियनशिपसाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख १५ मे होती, परंतु तात्पुरती समितीने एशियन रेसलिंग आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंगला प्रवेशाची तारीख वाढवण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांना प्रवेशासाठी २२ मे ही तारीख देण्यात आली. त्यामुळेच आता १७ ते १९ मे दरम्यान या चाचण्या घेण्यात आल्या.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत सुरू असलेले आंदोलन जंतरमंतरवरून रामलीला मैदानावर हलविण्याच्या आणि आंदोलानाला राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप देण्याच्या सूचना आंदोलनाच्या २४व्या दिवशी एका संघटनेच्या वतीने समोर आल्या आहेत. अर्थात, कुस्तिगीरांनी यावर थेट भाष्य केलेले नाही.