काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेने (आयओसी) पारंपरिक कुस्तीला ऑलिम्पिक खेळांमधून वगळण्याचा विचार मांडला आणि त्यावर साऱ्या क्रीडा विश्वातून नाराजीचा सूर उमटला. कुस्तीला चीतपट होऊ द्यायचे नाही, या विचाराने जागतिक कुस्ती महासंघाने आयओसीने दाखवलेल्या त्रुटींवर अभ्यास केला असून नवीन नियमांमुळे कुस्ती ऑलिम्पिकमध्ये कायम राहील, असा विश्वास महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक चिटणीस आणि आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने पंचांसाठी या नवीन नियमांच्या उजळणी वर्गाचे आयोजन केले असून कथुरे हे नवीन नियम त्यांना समजावून सांगणार आहेत.
जागतिक कुस्ती संघटनेच्या नवीन नियमांबद्दल कथुरे म्हणाले की, ‘‘जागतिक कुस्ती संघटनेने काही नवीन नियम बनवले आहेत, पण यामधले तीन नियम फार महत्त्वाचे आहेत. त्यामधील पहिला नियम असा की, यापुढे कुस्तीमध्ये तीनऐवजी दोन मिनिटांच्या फेऱ्या असतील. पूर्वी कॅडेट गटाच्या २ मिनिटांच्या ३ आणि वरिष्ठ गटाच्या ३ मिनिटांच्या ३ फेऱ्या व्हायच्या. पण आता कॅडेट गटाच्या २ मिनिटांच्या २ आणि वरिष्ठ गटाच्या ३ मिनिटांच्या २ फेऱ्या होतील. त्याचबरोबर यापूर्वी प्रत्येक फेरीनंतर विजेता घोषित केला जायचा. पण आता सर्व फेऱ्यांच्या एकूण गुणांनुसार विजेता ठरवला जाईल. तर तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे जर कोणता कुस्तीपटू खेळण्यासाठी टाळाटाळ करत असेल किंवा कुस्ती लढत नसेल तर त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. हे नियम जागतिक स्तरावर लागू झाले असून भारतामध्ये लवकरच या नियमांची अमलबजावणी करण्यात येईल.’’
जागतिक संघटनेने नियम बदण्याचे नेमके कारण काय असेल, असे विचारल्यावर कथुरे म्हणाले की, ‘‘नियम बदलण्याचे कारण म्हणजे आयओसीने ऑलिम्पिकमधून कुस्तीला हद्दपार केले. आयओसीने कुस्तीबद्दल जे आक्षेप नोंदवले होते, ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्याचा सखोल अभ्यास जागतिक संघटनेने केला आहे आणि त्यानुसार खेळात सुधारणा व्हावी, खेळ ऑलिम्पिकमध्ये कायम राहावा यासाठी हे नवीन नियम बनवण्यात आले आहेत.’’
या नियमांचा कुस्तीला काय फायदा होईल, यावर कथुरे म्हणाले की, ‘‘नवीन नियमांनुसार दोन फेऱ्या असल्याने पूर्वीसारखा खेळ जास्त काळ चालणार नाही. त्याचबरोबर आता मल्ल टाळाटाळ करणार नाहीत. या नवीन नियमांमुळे कुस्ती अधिकाधिक जलद होईल. त्यांना पूर्वीपेक्षा जास्त मेहनत आणि सराव करावा लागेल. आयओसीने कुस्तीला जास्त प्रेक्षक नसल्याचे म्हटले होते, पण या नवीन नियमांमुळे कुस्तीला प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढेल आणि कुस्ती ऑलिम्पिकमध्ये कायम राहील, असा विश्वास मला आहे.’
नियमांमधील तीन महत्त्वाचे बदल पुढीलप्रमाणे
१. आता प्रत्येक गटामध्ये फक्त दोन फेऱ्या खेळवल्या जातील.
२. दोन्ही फेऱ्यांनंतर एकूण गुणांच्या आधारे विजेता ठरवला जाईल.
३. टाळाटाळ करणाऱ्या खेळाडूविरुद्ध कारवाई करण्यात येईल.