भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रभावी नेतृत्त्वाबरोबरच एक यष्टीरक्षक म्हणून क्रिकेटविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्याच्या घडीला तो जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान शंभरावा फलंदाज बाद करत एकदिवसीयमध्ये धोनीनं एक नवा विक्रम प्रस्थापित केला. धोनीने शंभरहून अधिक फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला असला तरी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला नवोदित यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने प्रभावित केलय. साहा धोनीपेक्षा अधिक चांगला यष्टीरक्षक असल्याचे मत गांगुलीने व्यक्त केले आहे. धोनीने स्वत:ला सिद्ध केले आहे. पण सध्याच्या घडीला भारतीय संघाने वृद्धिमान साहाकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे गांगुली एका मुलाखतीमध्ये म्हणाला. भारतीय संघाने अशा यष्टीरक्षकावर नजर ठेवायला हवी की, जो धोनीपेक्षा उत्तम असेल.

गांगुली म्हणाला, धोनी २०१९ च्या विश्वचषकापर्यंत खेळेल. कर्णधार विराटला देखील ते अपेक्षित आहे. धोनी पारंपारिक यष्टीरक्षक नसून त्याने स्वत:मध्ये बदल करत सर्वोच्च शिखर गाठल्याचे देखील गांगुलीने यावेळी सांगितले. वृद्धिमान सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सक्षम आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे धोनीनंतर एक चांगला पर्याय उपलब्ध असल्याचे गांगुलीने म्हटले आहे.

धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून वृद्धिमान साहा कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे. साहाने २८ कसोटीत ५६ झेल केले असून १० फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. तर नऊ एकदिवसीय सामन्यात त्याने आतापर्यंत एका फलंदाजाला यष्टीचीत केले आहे. धोनीने आतापर्यंतच्या कारकीर्दीत ऑफ स्पिनरच्या गोलंदाजीवर सर्वाधिक फलंदाजांना बाद केले आहेत. धोनी आणि कुमार संगकारा यांच्यानंतर श्रीलंकेचा कालूवितरणाने ७५ फलंदाजांना यष्टीचीत केले असून, तो तिसऱ्या स्थानावर आहे. तर ७३ फलंदाजांना यष्टीचीत करणारा पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक मोईन खान चौथ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम गिलख्रिस्ट या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने ५५ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.

Story img Loader