वृद्धिमान साहा मैदानावरील आपल्या शांत आणि संयमी खेळासाठी ओळखला जातो. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीपासूनच तो काहीनाकाही कारणामुळे सातत्याने चर्चेत राहिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्याला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबद्दल काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. याच दरम्यान, पत्रकार बोरिया मजुमदार यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप साहाने केला होता. शिवाय त्याने यासंदर्भातील सोशल मीडिया चॅटही प्रसिद्ध केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मजुमदारवर कारवाईदेखील केली होती. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले. आता सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत असतानाच साहा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा संपल्यानंतर होणाऱ्या रणजी करंडक बाद फेरीतील सामन्यांपूर्वी त्याने बंगालचा संघ सोडण्याचे संकेत दिले आहेत. साहाने बुधवारी (२५ मे) रात्री संघाचा अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा वृद्धिमान साहा वादात सापडला होता, तेव्हा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (कॅब) सहसचिव देवव्रत दास यांनी पत्रकारांसमोर साहाच्या संघाप्रती असलेल्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. साहाने रणजी ट्रॉफी न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कॅबचे सहसचिव देवव्रत दास नाराज झाले होते. त्यांनी साहाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भारतीय संघात नसताना साहाने रणजी ट्रॉफीत बंगालकडून खेळण्यास काहीच हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते. जर तो नकार देत आहेत तर बंगालप्रती त्याची कोणतीही जबाबदारी नाही, असे आपण गृहीत धरले पाहिजे का? असेही दास म्हणाले होते.
वृद्धिमान साहाने बंगालचा व्हॉट्सअॅप ग्रुप सोडल्यानंतर त्याच्या पत्नीने याप्रकरणी वक्तव्य केले आहे. याबाबत साहाची पत्नी रोमी म्हणाली की, ‘वृद्धिमानच्या खेळ भावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे तो फार दुखावला आहे. ६ जूनपासून झारखंडविरुद्धच्या रणजी उपांत्यपूर्व फेरीसाठी बंगालचा संघ जाहीर करण्यात आला तेव्हा त्यात त्याच्या नावाचा समावेश नव्हता. म्हणून त्याने ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.’
साहा गेल्या १५ वर्षांपासून बंगालच्या संघासोबत आहे. त्याने बंगालसाठी १२२ प्रथम श्रेणी आणि १०२ लिस्ट-ए सामने खेळले आहेत. मात्र, आता हे संबंध संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.