वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयानंतरही भारतीय संघाच्या निवडीवरुन अनेक चर्चा सुरुच आहेत. भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनी, ऋषभ पंत ऐवजी वृद्धीमान साहाला यष्टीरक्षणाची संधी मिळायला हवी असं वक्तव्य केलं आहे. ते कोलकात्यात एका खासगी कार्यक्रमात बोलत होते.

“ऋषभ अजुनही पाळण्यातच आहे. त्याची शैली चांगली आहे, मात्र त्याला अजुन बऱ्याच गोष्टी शिकण्याची गरज आहे. यष्टीरक्षक ही मैदानातली सर्वात कठीण जागा असते. कोणीही येऊन ग्वोव्ह्ज घातले की यष्टीरक्षक होत नाही. मध्यंतरीच्या काळात साहा दुखापतीमुळे संघाबाहेर होता, मात्र त्याला योग्य संधी मिळायला हवी. जर तुम्ही त्याला संघात संधीच देणार नसाल तर त्याची निवड करण्यामागचं कारण काय आहे.”? किरमाणी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

केवळ चांगल्या कामगिरीच्या जोरावर खेळाडूला संघात जागा मिळायला हवी. स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर साहाला संघात जागा मिळाली आहे. पण जेव्हा काही कारणामुळे तुम्ही संघापासून दुरावता तेव्हा दुसरा खेळाडू तुमची जागा घेतो. त्यामुळे आता मैदानात फलंदाजी असो किंवा चांगलं यष्टीरक्षक कोणाची कामगिरी अधिक सरस होते हे पाहणं गरजेचं असतं. मात्र यासाठी साहाला दुसऱ्या कसोटीमध्ये संधी मिळायला हवी. किरमाणी यांनी आपलं मत मांडलं. ३० ऑगस्टपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे, त्यामुळे या सामन्यात साहाला संधी मिळते का हे पहावं लागणार आहे.

Story img Loader