श्रीलंकेविरुद्ध ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा करतानाच मर्यादित षटकांच्या दोन्ही प्रकारांचा कर्णधार रोहित शर्माकडेच कसोटी संघाचंही नेतृत्व सोपवण्यात आलं. दरम्यान अपेक्षित कामगिरी करण्यात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा आणि इशांत शर्मा या अनुभवी खेळाडूंना भारताच्या कसोटी संघातून वगळलं आहे. संघातून डच्चू देण्यात आल्याने वृद्धिमान साहा प्रचंड नाराज झाला असून संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृद्धिमान साहाने राहुल द्रविड नेतृत्व करत असलेल्या संघ व्यवस्थापनाने आपल्याला यापुढे निवड करताना विचार केला जाणार नसल्याचं सांगत निवृत्तीचा सल्ला दिल्याचा खुलासा केला आहे. ८ फेब्रुवारीला पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघात निवड होणार नाही असं सांगण्यात आल्याने वृद्धिमान साहाने रणजी ट्रॉफीमधून माघार घेतली.

रहाणे, पुजाराला वगळले; साहा, इशांतलाही डच्चू; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी संघ जाहीर

“संघ व्यवस्थापनाने मला यापुढे संघ निवडीत विचार केला जाणार नाही असं सांगितलं. जोपर्यंत मी भारतीय संघाच्या सेटअपचा भाग होतो तोपर्यंत मी हे सांगू शकत नव्हतो,” असा धक्कादायक खुलासा वृद्धिमान साहाने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. “प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही मला निवृत्ती घेण्याबद्दल विचार करण्याचा सल्ला दिला,” असं यावेळी वृद्धिमान साहाने सांगितलं.

वृद्धिमान साहाने यावेळी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीविरोधातही संताप व्यक्त केला. गांगुलीने आपल्याला संघातील स्थान पक्कं असून, चिंता करु नको अशा शब्द दिला होता असा दावा वृद्धिमान साहाने केला आहे.

“गेल्यावर्षी मी कानपूरमध्ये न्यूझीलंडविरोधात पहिल्या कसोटी सामन्यात नाबाद ६१ धावा केल्या तेव्हा गांगुलीने व्हॉट्सअपवर मेसेज करत माझं अभिनंदन केलं होतं. यावेळी त्यांनी जोपर्यंत मी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आहे तोपर्यंत कोणतीही चिंता करु नको असंही म्हटलं होतं. बोर्डाच्या अध्यक्षांकडूनच असा मेसेज आल्याने माझा आत्मविश्वास उंचावला होता. पण इतक्या वेगाने गोष्टी का बदलल्या हे समजण्यात मी अपयशी ठरलोय,” असा खुलासा वृद्धिमान साहाने केला आहे.