महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या निवड समितीने ऋषभ पंतवर विश्वास टाकत त्याला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी दिली. मात्र विंडीज आणि पाठोपाठ आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋषभने फलंदाजीत पुरती निराशा केली. या खराब कामगिरीचा फटका अखेरीस ऋषभला बसला आहे. आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत सलामीच्या सामन्यात ऋषभ पंतऐवजी वृद्धीमान साहाला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं विराट कोहलीने स्पष्ट केलं आहे. पहिल्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली बोलत होता.

अवश्य वाचा – भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतो संघात धोनीची जागा घेणं कठीणच !

कसोटी मालिकेत यष्टीरक्षक कोण असेल असा प्रश्न विचारला असता विराट कोहली म्हणाला,”वृद्धीमान साहा आता तंदुरुस्त आहे आणि तो आमच्यासाठी कसोटी मालिकेची सुरुवात करेल. त्याचं यष्टीरक्षणातलं कौशल्य आपण सर्वांनीच अनुभवलं आहे. ज्यावेळी त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली आहे. मध्यंतरी दुर्दैवाने त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर जावं लागलं होतं. माझ्यादृष्टीने तो सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. सध्याची खेळपट्टी पाहता पहिल्या कसोटीत वृद्धीमान भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून काम करेल.” दरम्यान पहिल्या कसोटीसाठी भारताने आपल्या अंतिम ११ जणांच्या संघाची घोषणाही केली आहे.

दुखापतीमुळे वृद्धीमान साहा वर्षभर क्रिकेटपासून दूर होता. या काळात ऋषभ पंतला आपलं संघातलं स्थान पक्क करण्याची चांगली संधी होती. मात्र फलंदाजीत त्याच्या कामगिरीमध्ये कधीच सातत्य दिसलं नाही. मात्र साहाने दुखापतीनंतर पुनरागमन करताना स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेतही साहाला विश्रांती देत पंतला संधी देण्यात आली होती, मात्र या संधीचं सोन त्याला करता आलं नाही. २ ऑक्टोबरपासून विशाखापट्टणमच्या मैदानावर भारत आणि आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जाईल.