तिहार तुरुंगात आत्महत्येचा विषय मनात आलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने दिल्ली न्यायालयाच्या निर्णयानंतर मोकळा श्वास घेतला आहे. श्रीशांतने आता सरावालाही सुरुवात केली असून आजीवन बंदी उठवण्यासाठी तो आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) साकडे घालणार आहे.
‘‘बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांची मला भेट घ्यायची आहे. माझ्यावरील आजीवन बंदी उठवावी यासाठी मी बीसीसीआयला पत्र लिहिणार आहे. मला अशी आशा आहे की, माझी विनंती मान्य करून ते मला क्रिकेट खेळायची परवानगी देतील. मी अनुराग ठाकूर यांच्या दूरध्वनीची वाट पाहत आहे. आगामी बैठकीमध्ये बीसीसीआय यावर सकारात्मक निर्णय घेईल, अशी मला आशा आहे,’’ असे श्रीशांतने सांगितले.
आयपीएलच्या सहाव्या हंगामामध्ये स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपाखाली श्रीशांतला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सट्टेबाजीबरोबर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याचा साथीदार छोटा शकील यांच्याशी संबंध असल्याचा आरोप श्रीशांतवर ठेवण्यात आला होता. पण यासंबंधित सकृद्दर्शनी पुरावे न आढळल्याने त्याची दिल्ली न्यायालयाने निर्देष मुक्तता केली आहे.
‘‘यापूर्वी आत्महत्या करण्याचा विचार माझ्या मनात आला होता. पण देवाचे आशीर्वाद आणि घरच्यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे मी त्यापासून परावृत्त होऊ शकलो,’’ असे श्रीशांत म्हणाला.
बीसीसीआयकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल का, असे विचारल्यावर श्रीशांत म्हणाला की, ‘‘बीसीसीआय ही व्यक्ती नसून ती एक संस्था आहे. मी वाट पाहायला तयार आहे. मला कोणालाही आव्हान द्यायचे नाही, मला फक्त क्रिकेट खेळायचे आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा