मुंबईच्या स्थानिक क्रिकेटचे स्वरूप बदलताना कांगा लीग क्रिकेट स्पर्धा बंद केल्या, असा चुकीचा निवडणूक प्रचार प्रतिस्पर्धी पॅनेल करीत आहे. गेली दोन वष्रे हे बदललेले स्वरूप मुंबई क्रिकेटमध्ये राबवण्यात येत आहे. ज्या कार्यकारिणी समितीने या बदलाला मान्यता दिली, त्यात सध्या संयुक्त सचिव पदाची निवडणूक लढणारे व्यक्तीसुद्धा होते; परंतु या क्रिकेटपटूने या बदलाबाबत कोणताही विरोध दर्शवला नव्हता. कांगा लीग बंद पडली, हा आरोप चुकीचा आहे. ही स्पर्धा सुरू असून फक्त जुलैऐवजी त्या सप्टेंबरला सुरू होत आहेत आणि खेळाडू या नव्या स्वरूपाबाबत समाधानी आहेत, असे स्पष्टीकरण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी दिले. एमसीएच्या निवडणुकीत संयुक्त सचिवपदासाठी लढणाऱ्या सावंत यांच्याशी केलेली बातचीत-
कांगा लीगच्या स्वरूपात बदल करण्यामागे कोणता उद्देश होता?
कांगा लीगचे सर्व सामने व्हायला हवेत, हा आमचा स्पर्धाचे स्वरूप बदलतानाचा महत्त्वाचा उद्देश होता. बदललेल्या तारखांमुळे खेळाडूंना थोडय़ाशा ओलसर, कोरडय़ा आणि आदर्श खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव मिळतो. जुन्या स्वरूपात गेल्या काही वर्षांत पावसाळय़ातील अनेक सामने रद्द होत आहेत, हे लक्षात आल्यामुळेच हे पाऊल उचलावे लागले आहे. एके काळी सुनील गावस्कर, अजित वाडेकर, रमाकांत देसाई, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, लालचंद रजपूत यांच्यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कांगा लीगमध्ये खेळायचे; परंतु आता आंतरराष्ट्रीय खेळाडू कांगा लीगमध्ये खेळताना दिसत नाहीत. प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आर्थिक फायद्यासाठी काऊंटी क्रिकेट खेळणे पसंत करतात. उरलेल्या उदयोन्मुख खेळाडूंना पावसाळय़ातील या स्पध्रेत खेळण्यात रस नसतो. हजारो रुपयांच्या बूट व बॅटसह या स्पध्रेत खेळण्याची जोखीम त्यांना नको असते. आताची पिढी थोडी जरी खेळपट्टी ओलसर असेल तरी खेळण्यासाठी अनुत्सुक असते. पंच, सामनाधिकाऱ्यांकडे सामना थांबवायची मागणी करतात. त्या वेळी इंग्लंडमध्ये ओलसर खेळपट्टीवर खेळायला लागायचे. त्यामुळे कांगाचे महत्त्व अधोरेखित होते. आता जगभरात झाकलेल्या खेळपट्टय़ांवर खेळावे लागते. हे बदल करण्यापूर्वी वयाच्या ७५ व्या वर्षांपर्यंत कांगा लीग खेळणाऱ्या माधव आपटे यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंचे सल्ले घेतले. कार्यकारिणीच्या तीन-चार बैठकांमध्ये हा विषय चर्चेला आला आणि त्यानंतर हे स्वरूप बदलले गेले.
स्पर्धाच्या बदललेल्या स्वरूपामुळे कोणते फायदे दिसून आले?
बदललेल्या स्वरूपामुळे सामने वाढले आहेत. आधीच्या बादफेरीच्या सामन्यांची जागा राऊंड रॉबिन लीगने घेतली. त्यामुळे खेळाडूंना कामगिरी दाखवण्यासाठी अधिक सामने वाटय़ाला येतात. लीग असल्यामुळे हरायची भीती नाही, त्यामुळे खेळाडूंना संधी मिळते. याचप्रमाणे निवड समिती सदस्यांना गुणवत्ता हेरता येत आहे.
एमसीएच्या निवडणुकीला यंदा राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे, याबाबत तुमचे काय मत आहे?
शरद पवार गेली अनेक वष्रे एमसीएमध्ये सक्रिय पदाधिकारी आहेत; परंतु राष्ट्रवादीचे अनेक आमदार, नेते एमसीएचे सदस्य असतानाही त्यांनी यापैकी कोणालाही या व्यासपीठावर आणलेले नाही. कोणत्याही पक्षाचा व्यक्ती म्हणून नव्हे, तर तुमचे कार्य असेल तर आम्ही तुम्हाला नक्की संधी देऊ, अशी बाळ म्हाडदळकर गटाची भूमिका आहे. आशीष शेलार जेव्हा म्हाडदळकर गटात सामील झाले, तेव्हा त्यांना इतके राजकीय वलय नव्हते. ते सामान्य कार्यकर्ता होते. याशिवाय प्रतिस्पर्धी गटातील एका विशिष्ट पक्षातील मंडळी म्हाडदळकर गटाकडे आली होती. महत्त्वाच्या दोन जागा आणि काही कार्यकारिणीच्या जागा अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी आमच्यापुढे ठेवला; परंतु आमचा या मागणीला विरोध होता. राजकारण बाहेर ठेवून मुंबई क्रिकेटच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आमचे मत होते.
एमसीएच्या निवडणुकीला सामोरे जाताना तुमची कोणती उद्दिष्टे आहेत?
मुंबई क्रिकेटमध्ये सोयीसुविधा सर्व उपलब्ध आहेत; परंतु मुंबईच्या संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नाही. मी चार्टर्ड अकाऊंटंट असल्याने कोषाध्यक्ष पदाला लायक उमेदवार आहे; परंतु मला सुरक्षित खुर्चीवर बसायचे नाही. धोरणनिश्चितीचे पद मला आवश्यक होते. म्हणून मी संयुक्त सचिव पदासाठी लढत आहे.
मुंबई क्रिकेटमध्ये दुसऱ्या फळीची वानवा आहे, असे म्हटले जात आहे. याविषयी तुमचे काय मत आहे?
निवड प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी होऊन ती अधिक ‘तंत्र’शुद्ध व्हायला हवी. तंत्रज्ञानाचा उपयोग करून तुम्हाला खेळाडूंच्या कामगिरीची माहिती मिळू शकते. या कामगिरीचे पृथक्करण करून संघबांधणी व्हायला हवी. निवड समितीने खेळाडूंच्या कामगिरीची आकडेवारी सोबत घेऊन बसायला हवे. त्यामुळे चांगली कामगिरी करणारे अनेक खेळाडू दुर्लक्षित राहतात. त्यानंतर एकंदर संघबांधणी करताना यावर चर्चा करून आपला निर्णयाधिकार वापरा.
आझाद मैदान, शिवाजी पार्क या ठिकाणी प्राथमिक सुविधांची बरीच वानवा आहे. याबाबत कोणत्या सुधारणा तुम्हाला अभिप्रेत आहे?
या मैदानांना पुरातन वास्तूचा दर्जा असल्याने सरकारी अडचणी येतात. नुकतीच आम्ही मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांची भेट घेतली, त्या वेळी आम्ही या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. या मैदानांवर क्रिकेट अनेक वष्रे चालू आहे. या पुरातन वास्तूला अनुकूल ठरेल, अशा पॅव्हेलियनचा आराखडा आम्ही सादर करतो. तुम्हाला योग्य वाटल्यास तो मंजूर करा. मग आम्ही तो बांधू, असा प्रस्ताव आम्ही सादर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wrong publicity about kanga league close says ravi sawant
Show comments