सर्व्हिस करण्याबाबतच्या नव्या नियमासाठी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने ऑल इंग्लंड स्पर्धेची निवड केली, एखाद्या महत्त्वपूर्ण नियमाची अंमलबजावणी करण्याची ही चुकीची वेळ आहे. ही स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची असल्यामुळे त्याऐवजी अन्य एखाद्या स्पर्धेपासून प्रयोग करायला पाहिजे होता, असे ऑलिम्पिक व जागतिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाच्या भरगच्च कार्यक्रमपत्रिकेबाबत कॅरोलीना मरीन, सायना नेहवाल यांच्यासह अनेक खेळाडूंनी टीका केली आहे.

त्यावर सिंधू म्हणाली की, ‘‘खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळण्यासाठी दोन स्पर्धामध्ये पुरेसा वेळ देण्याची गरज आहे. त्यातच पुढील वर्षी आशियाई क्रीडा, राष्ट्रकुल क्रीडा व जागतिक अजिंक्यपद स्पर्धाही होणार असल्यामुळे काही निवडक स्पर्धामध्ये भाग घेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.’’

पदक मिळविण्यासाठी तंदुरुस्तीस प्राधान्य – श्रीकांत

आशियाई क्रीडा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी होणार असून, त्यामध्ये पदक मिळविण्यासाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीला  प्राधान्य देणार आहे, असे जागतिक बॅडमिंटन क्रमवारीतील तृतीय स्थानावर असलेल्या किदम्बी श्रीकांतने सांगितले.

तो पुढे म्हणाला, ‘‘यंदा अनेक स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचा फायदा मला पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धासाठी होणार आहे. आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धाबरोबरच जागतिक स्पर्धेसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धाही होत असल्यामुळे वर्षभर भक्कम तंदुरुस्ती कशी राहील यासाठी मी पूरक व्यायाम करीत आहे. शंभर टक्के तंदुरुस्त असलो की आपोआपच पदक मिळविण्याच्या संधी वाढतात.’’

ऑल इंग्लंड स्पर्धेत प्रत्येक खेळाडू चांगले यश मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व्हिसबाबतच्या नवीन नियमावलीचा तेथे उपयोग केला गेला तर खेळाडूला त्यावर एकाग्रता देणे शक्य होणार नाही. त्यामुळे कदाचित खेळाडूची लय बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

–  पी. व्ही. सिंधू.