वर्षांतील दहाव्या स्पर्धेत अंतिम फेरीत धडक ; डब्ल्यूटीए टेनिस फायनल्स स्पर्धा
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस जोडीने यंदाच्या हंगामातला अद्भुत फॉर्म कायम राखताना डब्ल्यूटीए टेनिस फायनल्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. यंदाच्या वर्षांत एकत्र खेळताना या जोडीने अंतिम फेरीत आगेकूच करण्याची ही दहावी वेळ आहे. एकत्र खेळताना आठ जेतेपदे नावावर करणाऱ्या या जोडीला वर्षअखेरीस होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करण्याची सुवर्णसंधी आहे.
उपान्त्य फेरीच्या लढतीत सानिया-मार्टिना जोडीने तैपेईच्या चान हो चिंग आणि चान युंग जान जोडीवर ६-४, ६-२ असा सहज विजय मिळवला. या विजयासह सलग २१व्या विजयाची नोंद केली. सानिया-मार्टिना जोडीचा शेवटचा पराभव तैपेईच्या याच जोडीविरुद्ध सिनसिनाटी स्पर्धेत झाला होता. मात्र त्यानंतर या जोडीने तैपेईच्या जोडीला तीन वेळा नमवण्याची किमया केली आहे.
उपान्त्य फेरीच्या लढतीत तैपेईच्या जोडीने पहिल्या सेटमध्ये ३-१ अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर सानिया-मार्टिना जोडीने सलग ११ गुणांची कमाई करत सरशी साधली.
‘सानिया अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन असलेली खेळाडू आहे. कामगिरी चांगली होत नसताना, फटके स्वैर जाताना सानिया सतत संघर्ष करत राहते, मला प्रोत्साहन देते. तिच्यामुळेच आम्ही दमदार पुनरागमन करू शकतो’, असे मार्टिनाने सांगितले.
‘तैपेईच्या जोडीविरुद्ध आम्ही विशिष्ट रणनीती आखली होती. आमच्यापेक्षा ताकदवान जोडीविरुद्ध खेळताना काही तरी वेगळे करण्याची आवश्यकता होती. त्यानुसार आम्ही खेळ केला’, असे सानियाने सांगितले.
सानिया-मार्टिना जोडीने यंदा इंडियन वेल्स, मियामी, चार्ल्सटन, विम्बल्डन, अमेरिकन खुली स्पर्धा, गुआंगझाऊ, वुहान आणि बीजिंग स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत जेतेपदाची कमाई करत कारकीर्दीतील ५०वे डब्ल्यूटीए जेतेपद पटकावण्याची मार्टिनाला संधी आहे. याआधी केवळ १५ टेनिसपटूंना अशी कामगिरी करता आली आहे.