भारतीय संघ सध्या द ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळत आहे. या शानदार सामन्याचा आज शेवटचा दिवस असून याचदरम्यान टीम इंडियाच्या पुढील आवृत्तीत होणाऱ्या मालिकेची माहिती समोर आली आहे. भारतीय संघ २०२३ ते २०२५ मध्ये अंतिम फेरीपर्यंत एकूण ६ मालिका आणि १९ कसोटी सामने खेळणार आहे. टीम इंडियाची ही सलग दुसरी फायनल आहे. पहिल्या आवृत्तीत टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारतीय संघ २०२३-२५ मध्ये आपल्या WTC मोहिमेची सुरुवात जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने करेल. याशिवाय टीम इंडियाला पुढील दोन वर्षांत आणखी दोन परदेशी कसोटी मालिका आणि तीन देशांतर्गत कसोटी मालिका खेळायच्या आहेत. यादरम्यान टीम इंडियाचा सामना सर्व SENA देशांशी (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) होणार आहे. या व्यतिरिक्त भारत या काळात वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकाही खेळणार आहे.
टीम इंडियाचे वेळापत्रक काय आहे?
पुढील दोन वर्षांत टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या आवृत्तीत आणखी १९ सामने खेळणार आहे. भारताने या लीगच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक २२ सामने जिंकले आहेत तर एकूण २९ सामने खेळले आहेत. जर संघाने अंतिम फेरीत विजय मिळवला तर हा २३वा विजय असेल. इंग्लंडने ३५ सामने खेळले असून एकूण २१ सामने जिंकले असून, इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी, सध्याचा अंतिम सामना वगळता ऑस्ट्रेलियाने २५ पैकी एकूण १९ सामने जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला
ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसरा डाव २३४ धावांत आटोपला. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना २०९ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. यासह सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला आहे. त्याचबरोबर भारताला सलग दुसऱ्यांदा कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह भारताचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ कायम आहे. टीम इंडियाने गेल्या १० वर्षात एकही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही. २०१३ साली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.