India vs Australia, WTC 2023 Final: टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवामुळे संघाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. गेल्या दहा वर्षांत टीम इंडियाला जेतेपदाच्या जवळ येऊनही अनेकदा पराभव पत्करावा लागला. रविवारी धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. टीम इंडियाबाबत अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
भारतीय संघाचे धडाकेबाज फलंदाज पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. अखेर संघाला आणखी एक आयसीसी ट्रॉफी हातातून गमवावी लागली. या पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. खरेतर, कसोटीतील नंबर १ गोलंदाज रविचंद्रन अश्विनला मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात बाहेर ठेवण्याचा निर्णय अनेक दिग्गजांना समजला नाही, वीरेंद्र सेहवाग त्यापैकीच एक होता. टीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर सेहवागचा राग अनावर झाला.
भारताने सामना आधीच मानसिकरित्या गमावला होता
पराभवानंतर भारताचा माजी खेळाडू सेहवागने ट्वीट केले आणि म्हटले, “WTC फायनल जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन! ते विजयास पात्र होते. ऑस्ट्रेलियाच्या मजबूत डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध भारताने कुठलाही विचार केला नाही. जर तसा विचार केला असता तर अश्विनला बाहेर ठेवण्याचा निर्णय कधीच घेतला नसता यावरून असे दिसत होते की, “भारत हा सामना मानसिकदृष्ट्या हरला होता.” टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांबाबत सेहवाग म्हणाला, “संघाच्या टॉप ऑर्डरच्या खेळाडूंना चांगली फलंदाजी करण्याची गरज होती. चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी चांगली मानसिकता आणि दृष्टीकोन आवश्यक आहे.”
ऑस्ट्रेलियाने इतिहास रचला
ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघाने इतिहासात ९व्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. एकदिवसीय विश्वचषक, टी२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून, ऑस्ट्रेलिया सर्व ICC ट्रॉफी जिंकणारा संघ बनला आहे. या सामन्यातील पराभवामुळे भारताने सलग दुसऱ्यांदा कसोटीत चॅम्पियन बनण्याची संधी गमावली आहे.
माहितीसाठी की अश्विन कसोटीतील नंबर-१ गोलंदाज आहे. विशेष म्हणजे त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने २२ सामन्यांच्या ४२ डावात ११४ विकेट घेतल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट उत्तर दिले नसले तरी त्याने अश्विनला बाहेर ठेवण्यामागे सामन्यातील परिस्थितीचा हवाला दिला.