आयपीएल २०२३ नंतर, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची अंतिम फेरी खेळायची आहे आणि निवडकर्त्यांनी या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील केली आहे. लंडनच्या किंग्स्टन ओव्हल मैदानावर ७ ते ११ जून दरम्यान होणाऱ्या या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या १५ खेळाडूंमध्ये अजिंक्य रहाणेचेही पुनरागमन झाले आहे.
मात्र, भारतीय संघाची घोषणा होताच अनेक माजी दिग्गज आणि क्रिकेट तज्ज्ञांनी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. या मते मांडण्याच्या एपिसोडमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने टीम इंडियाच्या सलामीवीरांबाबत वेगळं विधान केलं. त्याच्यामते इंग्लिश हवामानात भारताने शुबमन गिलच्या जागी के.एल. राहुलला सलामीवीर म्हणून निवडले पाहिजे.”
क्रिकबझसोबतच्या संभाषणात वॉन म्हणाला, “भारतीय संघ इंग्लिश परिस्थितीत एकमेव बदल करू शकतो तो म्हणजे केएल राहुल शुबमन गिलपेक्षा स्विंग चेंडू चांगला खेळतो. शुबमन हा उत्तम फलंदाज आहे पण तुम्हाला आयसीसीचा फायनल सामना जिंकायचा आहे. इतिहास विसरा, आता सर्वोत्तम संघ निवडण्याची वेळ आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी प्लेइंग इलेव्हन ही त्या परिस्थितीनुसार असायला हवी. शुबमन हा एक आक्रमक खेळाडू आहे जेव्हा खेळपट्टी सपाट असते अशावेळी त्याला संघात घेण्यात काही हरकत नाही, परंतु हिरव्या खेळपट्टीवर चेंडू जेव्हा स्विंग होईल तेव्हा त्याच्या फलंदाजीतील अधिक त्रुटी उघड होतील. मी काही तांत्रिक त्रुटी त्याच्या फलंदाजातील पाहिल्या आहेत. जेव्हा चेंडू हलतो तेव्हा तो चेंडू सोडण्याऐवजी खेळण्यास अधिक प्राधान्य देतो.” विनोदाने वॉर्न पुढे म्हणाला की, “ तो बॉलशी जरा जास्तच फ्लर्ट करतो.”
पुढे बोलताना वॉन म्हणाला, “तो असे करेल की नाही याची मला खात्री नाही (शुबमन गिलच्या जागी केएल राहुल) कारण मी संघ व्यवस्थापक नाही. पण पुढे परिस्थिती काय आहे किंवा कोण आहे हे पाहून संघ निवडू नका. तुम्हीं काय वेस्ट इंडिजमध्ये खेळायला जात नाहीत आहात. क्रिकेटच्या त्या एका सामन्यासाठी तुम्हाला संघ निवडायचा आहे.” सध्या शुबमन आणि राहुल दोघेही आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्मा या मोठ्या सामन्यासाठी के. एल. राहुलला सलामीवीर म्हणून पसंती देतो की शुबमन गिलसोबत जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.