WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना म्हणजेच WTC भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथच्या खेळीच्या जोरावर कांगारूंनी भारतावर आपली पकड घट्ट केली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ३ गडी गमावून ३२७ धावा केल्या आहेत. हेड १४६ नंतर स्मिथ ९५ धावा करून नाबाद खेळपट्टीवर तंबू ठोकून आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये चौथ्या विकेटसाठी २५१ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीसह हेड आणि स्मिथच्या जोडीने सर डॉन ब्रॅडमन यांचा ९३ वर्षे जुना विक्रम मोडला आहे.
इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या सर्वोच्च भागीदारीचा हा विक्रम आहे. या यादीत स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडची जोडी २५१ धावांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. सर डॉन ब्रॅडमन आणि आर्ची जॅक्सन यांच्या भागीदारीला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. या जोडीने १९३० मध्ये ओव्हलच्या याच मैदानावर २४३ धावा जोडल्या होत्या, स्मिथ आणि हेडच्या जोडीने आता त्यांना मागे टाकले आहे. या यादीत ब्रॅडमन यांचे नाव अजूनही वरच्या स्थानावर आहे. होय, १९३४ मध्ये ब्रॅडमनने बिल पॉन्सफोर्डसोबत हेडिंग्ले येथे चौथ्या विकेटसाठी ३८८ धावांची भागीदारी केली होती. ऑस्ट्रेलियासाठी इंग्लंडमध्ये चौथ्या विकेटची ही सर्वोच्च भागीदारी आहे.
इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियासाठी चौथ्या विकेटची सर्वोच्च भागीदारी
३८८ – डॉन ब्रॅडमन आणि बिल पॉन्सफोर्ड विरुद्ध इंग्लंड, हेडिंग्ले, १९३४
२५१* – स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड विरुद्ध भारत, ओव्हल, २०२३
२४३ – डॉन ब्रॅडमन आणि आर्ची जॅक्सन विरुद्ध इंग्लंड, ओव्हल, १९३०
२२१ – सिडनी ग्रेगरी आणि हॅरी ट्रॉट विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, १८९६
२१४ – मायकेल क्लार्क आणि स्टीव्ह स्मिथ विरुद्ध इंग्लंड, ओल्ड ट्रॅफर्ड, २०१३
त्याचबरोबर हेड आणि स्मिथची ही भागीदारी भारताविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी चौथी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. हेड आणि स्मिथ यांनी १९९९ मध्ये पाँटिंग आणि वॉ यांच्या भागीदारीचा विक्रम मोडला. त्या काळात अॅडलेडमध्ये पाँटिंग आणि वॉ यांनी २३९ धावांची भागीदारी केली होती.
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची कोणत्याही विकेटसाठीची सर्वात मोठी भागीदारी
३८६ – रिकी पाँटिंग आणि मायकेल क्लार्क, अॅडलेड, २०१२
३३४* – मायकेल क्लार्क आणि मायकेल हसी, सिडनी, २०१२
२८८ – रिकी पाँटिंग आणि मायकेल क्लार्क, सिडनी, २०१२
२५१* – स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड, ओव्हल, २०२३ २३९ – रिकी पाँटिंग आणि स्टीव्ह वॉ, अॅडलेड १९९९
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही. उस्मान ख्वाजा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला, तर पहिले सत्र संपण्यापूर्वी कांगारूंनी डेव्हिड वॉर्नरची विकेटही गमावली. उपाहारानंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा शमीने लाबुशेनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ७६ धावांत तीन गडी गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर होता, पण नंतर हेड आणि स्मिथच्या जोडीने अप्रतिम खेळ दाखवला.