भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून इंग्लंडमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. टीम इंडियाला २०१३ नंतर पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकायची संधी आली आहे. २०१३ मध्ये एम.एस.धोनीच्या नेतृत्त्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आता कर्णधार रोहित शर्माला ही सुवर्ण संधी आली असून त्याचे तो सोने करतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, आता या अंतिम सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चेंडूमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, फायनलमध्ये वापरल्या जाणार्या चेंडूबाबत आयसीसीकडून मोठी बातमी समोर येत आहे. भारतात कसोटी सामने एसजी चेंडूने खेळले जातात, तर ऑस्ट्रेलियात कुकाबुराचा चेंडू वापरला जातो. पण अंतिम सामना ड्युक चेंडूने होईल. क्रिकेटची जागतिक संघटना असलेल्या आयसीसीने ही माहिती दिली आहे. अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे.
आयसीसीच्या माहितीनुसार, अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. या प्रकरणात, यजमान देशानुसार, सामन्यात चेंडूचा वापर केला जाईल. इंग्लंडमधील कसोटी सामने ड्युक चेंडूने खेळले जातात. आयसीसीच्या सूत्राने सांगितले की, आयसीसी सामन्यात यजमान देशाच्या मर्जीतील चेंडूचा वापर करते. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये फक्त ड्युक बॉल वापरला जाईल. याआधी २०२१ मध्येही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्राचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवण्यात आला होता आणि तेव्हाही ड्युक चेंडूचा वापर करण्यात आला होता.
भारतीय खेळाडू कशी तयारी करत आहेत?
अलीकडेच भारतीय कर्णधार रोहित शर्माने ड्युक चेंडूच्या तयारीबाबत मोठी गोष्ट सांगितली होती. त्याने सांगितले की, “आम्ही सर्व वेगवान गोलंदाजांना ड्युक चेंडू पाठवत आहोत जेणेकरून ते या चेंडूने सराव करू शकतील.” २१ मे पर्यंत आयपीएल २०२३च्या प्लेऑफसाठी ४ संघ पात्र ठरतील. अशा परिस्थितीत जे खेळाडू मोकळे असतील, त्यांना आधी इंग्लंडला पाठवले जाईल, ते तिथे स्वत:ची तयारी करू शकतील. कसोटीसाठी निवडलेल्या संघाबद्दल बोलायचे झाले तर चेतेश्वर पुजारा आधीच इंग्लंडमध्ये असून तो काउंटी क्रिकेट खेळत आहे.
अंतिम फेरीसाठी हे दोन संघ आहेत
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, के.एस. भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
स्टँड बाय खेळाडू- ऋतुराज गायकवाड, नवदीप सैनी, सरफराज खान, इशान किशन, मुकेश कुमार
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (यष्टीरक्षक), स्कॉट बोलँड, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, अॅलेक्स केरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्क हॅरिस, जॉस हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिश, उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क.