भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एक गडी बाद केला आहे. त्याने न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉन्वेला बाद केले. कॉन्वेला माघारी धाडत त्याने आपल्या नावावर दोन विक्रमांची नोंद केली. टीम इंडियाचे दिग्गज माजी गोलंदाज कपिल देव यांना त्याने मागे टाकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्याच्या तिसर्‍या दिवशी इशांत शर्माने कॉन्वेला मोहम्मद शमीकरवी झेलबाद केले. त्याने ५४ धावा केल्या. आत्तापर्यंतच्या तीन कसोटीत ५० पेक्षा जास्त धावा काढणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत तीन कसोटी सामने खेळले आहेत आणि सर्व कसोटींमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याच्या जोरावर न्यूझीलंडने इंग्लंडला त्यांच्याच घरातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-०ने पराभूत केले.

इंग्लंडमध्ये सर्वाधिक बळी

इशांतने इंग्लंडमध्ये ४४ विकेट्स घेतल्या आहेत. अशा प्रकारे तो इंग्लंडमधील सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने आतापर्यंत १३ सामन्यांच्या २० डावात ४४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोन वेळा एका डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. इशांतने कपिल देव यांना मागे टाकले. कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये ११ सामन्यांच्या २२ डावांमध्ये ४३ बळी घेतले. या विक्रमात भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू अनिल कुंबळे (३६) तिसर्‍या, बिशनसिंग बेदी (३५) चौथ्या आणि झहीर खान (३१) पाचव्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा – WTC Final Day 4 Live : पावसामुळे पहिले आणि तिसरे सत्र वाया जाण्याची शक्यता

भारताबाहेरील कसोटीत २०० बळी

याव्यतिरिक्त इशांत शर्माच्या भारताबाहेरील कसोटीत २०० बळी पूर्ण झाले आहेत. असे करणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला. इशांतने ६१ सामन्यात २०० बळी घेतले आहेत. त्याने ९ वेळा पाच गडी आणि एकदा १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. ७४ धावांत ७ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय अनिल कुंबळे (२६९), कपिल देव (२१५) आणि झहीर खान (२०७) यांनीही घराबाहेर २०० हून अधिक बळी घेतले आहेत.

भारत पहिल्या डावात २१७ धावांवर बाद झाल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडने लॅथम आणि कॉन्वेच्या दमदार सलामीमुळे तिसऱ्या दिवसअखेर ४९ षटकांत २ बाद १०१ धावा केल्या. कर्णधार केन विलियम्सन १२ धावांवर आणि रॉस टेलर शून्यावर नाबाद आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc final ishant sharma sets two records by taking one wicket adn
Show comments